24 कॅरेट सोन्याचा थर, 3.8 लाखांचे अमेरिकन हिरे 48 किलो वजनाच्या सुवर्ण गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, विविध रूपांतील आणि आकर्षक सजावटीतील गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तेलंगणातील हैदराबाद शहरातील बेगमबाजार परिसरातील फीलखाना येथे स्थापित करण्यात आलेली सुवर्ण गणेशमूर्ती सध्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. या भव्य मूर्तीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत आहेत.

सुमारे ४८ किलो वजनाच्या या गणेशमूर्तीवर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा थर चढवण्यात आला आहे. तसेच मूर्तीवर ३.८ लाख रुपयांहून अधिक अमेरिकन हिरे जडवण्यात आले आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीची निर्मिती करण्यासाठी तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लागला. आठ कुशल कारागिरांनी एकत्रितपणे ही मूर्ती तयार केली आहे.

पंचधातूपासून मूर्तीची निर्मिती

या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य केवळ सोन्याचा मुलामा आणि हिऱ्यांपुरते मर्यादित नाही. मूर्तीच्या निर्मितीत धार्मिक प्रतीके आणि बारीकसारीक नक्षीकामावरही विशेष भर देण्यात आला आहे. ही मूर्ती पंचधातूपासून तयार करण्यात आली असून, तिचा पाया पितळ्याचा आहे. मूर्तीवरील बारकाईने केलेले नक्षीकाम जवळून पाहिल्यावर स्पष्टपणे जाणवते.

मूर्तीच्या मागील बाजूस भगवान विष्णूंच्या दहा अवतारांच्या कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे मूर्तीच्या धार्मिक आणि कलात्मक सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

लालबागच्या राजाची भव्यता, तिरुपती बालाजीची सजावट

या गणेशमूर्तीची सजावटही भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, गणेशमूर्तीची सजावट करताना महाराष्ट्रातील प्रसिद्ध लालबागचा राजा आणि तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर अर्थात तिरुपती बालाजी यांच्या रूपातून प्रेरणा घेण्यात आली आहे.

तिरुपती बालाजीप्रमाणे अलंकार आणि सजावट करण्यात आली असून, लालबागच्या राजाप्रमाणे गणेशाला राजेशाही स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे ही मूर्ती इतर गणेशमूर्तींपेक्षा वेगळी आणि अधिक भव्य दिसत आहे.