गंगटोकमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळली; निवासी भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गंगटोकमधील करमातार आणि अप्पर बुलुंग परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास स्थानिक शाळेच्या खालील भागात दरड कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

इंटेक येथील सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) ‘जी’ कंपनीच्या चौकीवरून दरड कोसळल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आपत्ती निवारण पथकाला तातडीने बाधित क्षेत्रात पाठवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

दरड कोसळलेल्या भागाच्या वर असलेल्या निवासी घरांना संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. यासाठी नागरी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी मदत केली. दरम्यान, अप्पर बुलुंग परिसरातही दरड कोसळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी एसएसबीला दिली. दरडीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. एसएसबीचे कंपनी कमांडर आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असला तरी या घटनेत जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. रस्त्यावरील दरडीचा ढिगारा हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री मागवण्यात आली आहे.