हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा आहे! संजय राऊत यांनी घेतला अमित शहांच्या विधानाचा समाचार; CM, DCM यांनाही सुनावले खडेबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. मराठी माणसाला सध्या जाती-पातीमध्ये फोडण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई किंवा महाराष्ट्र बहुभाषिक नाही. गृहमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हेच वाक्य चेन्नई, कोलकाता, गुजरात, केरळ, कर्नाटकमध्ये बोलावे. पार्श्वभागाला पाय लावून पळाल. पण महाराष्ट्रातील षंढ राज्यकर्ते हे वाक्य ऐकतात आणि टाळ्या वाजवतात, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लढवला. मंगळवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असे काल गृहमंत्री अमित शहा म्हणाले. हेच वाक्य तुम्ही चेन्नईत जाऊन बोलून दाखवा. हेच वाक्य कोलकाता, गुजरात, केरळ, कर्नाटकमध्ये जाऊन बोला. महाराष्ट्राला तुम्ही आंडू-पांडू समजता का मिस्टर अमित शहा? महाराष्ट्रातील षंढ राज्यकर्ते हे वाक्य ऐकतात आणि टाळ्या वाजवतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, सरकारमधील मंत्री आणि आमदार… यांनी उठून उभे राहायला हवे आणि महाराष्ट्र मराठी भाषिकांचा आहे हे ठणकावून सांगायला हवे, असेही संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र मराठी माणसाचा व्हावा यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले. मराठी भाषेला महत्व मिळावे, मराठी राजभाषा बनावी म्हणून संघर्ष केला आणि अमित शहा नावाचे गृहस्थ गृहमंत्री म्हणून येतात आणि म्हणतात महाराष्ट्र हा बहुभाषिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढातही हा महाराष्ट्र बहुरंगी आहे असे सांगण्यात आले, तेव्हा सगळ्यात मोठा उद्रेक महाराष्ट्रात झाला आणि आता आपण पुन्हा त्याच दिशेने चाललो आहोत.

कुणीही येतो आणि महाराष्ट्राच्या धोतराच्या कासोट्याला हात घालतोय. देवेंद्र फडणवीस यांनी खरे म्हणजे उठून उभे राहायला हवे होते आणि हा महाराष्ट्र मराठी भाषिकांचा आहे असे सांगायला हवे होते. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा, मराठी माणसांचा आहे असे यशवंतराव चव्हाण यांनी ठणकावून सांगितले होते, याचीही आठवण संजय राऊत यांनी राज्यकर्त्यांना करून दिली.

भाषिक अस्मितेला खतपाणी घातले जात आहे का असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आपल्या इकडे षंढ राज्यकर्ते बसल्याने याला खतपाणी घातले जात आहे. एखादा राज्यकर्ता असता तर उठून उभा राहिला असता आणि म्हणाला असता हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. 106 लोकांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र, मराठी भाषा तळपतेय. पण हे सांगण्याची हिंमत या षंढ राज्यकर्त्यांमध्ये आणि चुरूचुरू बोलणाऱ्या छोट्या हिंदुत्ववाद्यांमध्ये नाही. आमच्याच हिंमत आहे, आम्ही बोलतोय. काय करतील… आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होती. मराठी भाषेसाठी मी तुरुंगात जायला तयार आहे. पण हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आणि मराठी भाषिकांचा आहे. हे बहुभाषिक वगैरे नंतर, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.