
पैशाचे आमिष दाखवत नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन त्याआधारे अनेकांच्या नावाने सिमकार्ड खरेदी करायचे. त्या सिमकार्डच्या आधारे मग बँकांमध्ये म्युल खाते उघडून सायबर गुह्यातील फसवणूक झालेले कोट्यवधी रुपये मिळविणारी एक टोळी गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. त्या आरोपींनी सायबर फसवणुकीत 350 कोटींहून अधिक रकमेची अफरातफर करून आर्थिक लुटमार केल्याचे समोर आले आहे.
तिघे स्वतःच्या तसेच त्यांच्या साथीदारांच्या नावाने विविध बँकांमध्ये खाती उघडून ती खाती सिमकार्डशी लिंक करतात. त्यानंतर संबंधित बँक खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार्ड तसेच अन्य साधने स्वतःच्या ताब्यात घेऊन या खात्यांचा वापर ऑनलाईन सायबर फसवणुकीसाठी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनीट-5 ला माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तपास करून इस्लामुद्दीन शेख (44), यासीर शेख (26) आणि अब्दुल रौफ (42) या तिघांना अटक केली. आरोपींकडून विविध बँकांची 88 पासबुक, 143 चेकबुक, 100 एटीएम कार्ड, बँकांची अन्य कागदपत्रे, विविध कंपन्यांचे 24 मोबाईल फोन, 167 सिमकार्ड आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.






















































