
गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने मध्यरात्री निर्जन शिवारात अघोरी विधी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा बल्लारपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोलगाव-विसापूर मार्गालगत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या चारचाकी वाहनाचा माग काढत पोलिसांनी एक महिला व मांत्रिकासह नऊ जणांना अटक केली. यातील एक संशयित फरार आहे. मध्यरात्री विसापूर पोलीस चौकीला या वाहनाबाबत माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहनाची झडती घेतली. चौकशीत संशय आल्याने सर्वाना ताब्यात घेण्यात आले. तपासात मुख्य आरोपी देवागन सहारे याने इतरांना एकत्र आणल्याचे उघड झाले. श्यामराव आत्राम हा मांत्रिक म्हणून विधी करणार होता, तर इतरांवर खड्डा खोदणे व पूजा साहित्याची जबाबदारी होती. रामपूर येथील शांताराम हिंगणे याच्या शेतात गुप्तधन असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी ‘महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































