
सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन अर्थात CINTAA मधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. संघटनेच्या कथित हरवलेल्या कागदपत्रांवरून अभिनेत्री पूनम धिल्लन, पद्मिनी कोल्हापुरे, उपासना सिंग यांच्यासह काही सदस्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून मुंबई पोलिसांना CINTAAच्या कार्यालयात हस्तक्षेप करावा लागला.
हा वाद अधिक वाढल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकाऱ्याने सदस्यांना आवाज कमी करून पोलिसांचे म्हणणे ऐकण्यास सांगितले. तसेच, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वाद घालणे टाळावे, असेही त्यांनी बजावले. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पद्मिनी कोल्हापुरे, उपासना सिंग, प्रीती सप्रू, कुनिका सदानंद आणि इतर सदस्यांमध्ये तणावपूर्ण चर्चा होताना दिसत आहे. CINTAAची समिती बरखास्त झाल्याच्या दाव्यावर पद्मिनी यांनी प्रश्न उपस्थित करत, समिती बरखास्त झाल्याचा आदेश दाखवण्याची मागणी केली. या मुद्द्यावरून वाद अधिकच वाढला. उपासना सिंग आणि प्रीती सप्रू यांनी कथितरीत्या गहाळ झालेल्या कागदपत्रांबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, कुनिका सदानंद यांनी हा केवळ दिवाणी वाद नसून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याचा दावा केला. तसेच, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही सदस्यांना कार्यालयात प्रवेश करण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
उपलब्ध माहितीनुसार, CINTAAची महत्त्वाची कागदपत्रे कथितरीत्या अनधिकृतपणे कार्यालयातून बाहेर नेण्यात आल्याच्या आरोपावरून हा वाद सुरू झाला. या प्रकरणी उपासना सिंग यांनी मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समजते. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे CINTAAमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. मात्र, या प्रकरणातील विविध सदस्यांनी केलेले आरोप अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत. पूनम धिल्लन किंवा पद्मिनी कोल्हापुरे यांनी या वादावर अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
























































