
कोल्हापूर सर्किट बेंच व विभागीय उपनिबंधकांनी अवसायनातील 492 संस्था पात्र ठरविल्या होत्या. या संस्थांचा ‘गोकुळ’च्या अंतिम मतदारयादीत समावेशही झाला.या निर्णयाविरोधात आता इस्पुर्ली येथील श्रीराम दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संस्थेच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील यांनी पात्र दूध संस्थांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्याची तयारी केली आहे.संस्थांच्या वतीने ऍड. आनंद लांडगे बाजू मांडणार आहेत.
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीभोवतीचे न्यायालयीन वाद काही केल्या संपत नाहीत. इस्पुर्ली (ता. करवीर) येथील श्री राम दूध संस्थेने राज्य शासनाच्या सहकार विभागाविरोधात शुक्रवारी दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेमुळे ‘गोकुळ’च्या निवडणूक प्रक्रियेत नवा ट्विस्ट निर्माण झाला असून, याचिकेचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, हे लवकर स्पष्ट होईल.
‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या विविध न्यायालयीन सुनावणीमुळे चर्चेत आली आहे. आता ‘गोकुळ’चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या मंगळवारपासून (दि.15) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. याच दरम्यान इस्पुर्ली येथील श्री राम दूध संस्थेचे सदस्य रजनीकांत चेंडके यांनी महाराष्ट्र शासन आणि अन्य संबंधित विभागाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे अवसयानातील सुमारे 492 संस्था पुन्हा न्यायालयीन कचाट्यात सापडल्या आहेत.






















































