अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर, क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पूर्व, कोलडोंगरी येथील क्रांती गणेशोत्सव मंडळाचे (कोलडोंगरीचा विघ्नहर्ता) यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, मंडळ यंदा नामवंत कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून भारतातील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. ६० बाय ६० आकाराच्या मंडपात हे मंदिर साकारण्यात येत असून, गेल्या दोन महिन्यांपासून २५ ते ३० कारागीर यासाठी मेहनत घेत आहेत. सभामंडप पूर्णतः वातानुकूलित असणार आहे. विभागातील युवा मूर्तिकार मितेश डिंगणकर यांनी बाप्पाची सुबक मूर्ती साकारली आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे मंडळातर्फे यंदा १४ ते ३० सप्टेंबर दरम्यान १६ दिवस गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान मंडळ दर दिवशी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष व भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राजाभाऊ ठाणगे यांनी दिली. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा, आधार कार्ड कॅम्प, मोफत शववाहिनी, पूरग्रस्तांना मदत, गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च अशा सामाजिक उपक्रमांसोबतच शरीरसौष्ठव स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ अशा विविध स्पर्धा मंडळाकडून आयोजित केल्या जातात. मंडळाने यंदा ‘माझा लाडका लाडका लाडका कोलडोंगरीचा विघ्नहर्ता’ हे गाणे लाँच केले आहे. अमोल कदम हे या गाण्याचे गीतकार असून शिरीष पवार यांनी हे गाणे गायले आणि संगीतबद्ध केले आहे.