पुरातत्व डायरी – दिल्लीच्या इतिहासाची पुनर्रचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. आशुतोष पाटील
[email protected]

पुराणा किल्ल्याच्या उत्खननातून समोर येणारे चित्र हे एका दीर्घकालीन मानवी वस्तीचे आहे. उत्खननातून मिळालेली नऊ स्तरांची सांस्कृतिक मालिका दिल्लीच्या दीर्घकालीन वस्तीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

दिल्लीतील अत्यंत महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ पुराणा किल्लाच्या उत्खननातून प्राचीन सांस्कृतिक कालखंड ओळखण्यास मदत होते. उत्खननातून या टेकडीवर मौर्यपूर्व काळापासून मुघल काळापर्यंत मानवी वस्तीचे पुरावे प्राप्त झाले आहेत. मौर्यपूर्व, मौर्य, शुंग, कुषाण, गुप्त, गुप्तोत्तर, राजपूत, सुलतानकालीन आणि मुघल असे हे कालखंड. यातील मौर्यकालीन स्तरातून मिळालेली टेराकोटाची रिंग-वेल ही या कालखंडातील महत्त्वाची वास्तुरचना आहे. तिचा व्यास सुमारे 70 सेंटिमीटर असून उत्खननात 18 रिंग उघड झाल्या आहेत. तिची खोली सुमारे 2.20 मीटर आहे. याच स्तरातील जमिनीमध्ये दोन्ही बाजूंनी टेराकोटाच्या फरश्यांनी बांधलेली नालीही आढळली असून ती पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी वाहून नेत असावी, असा अंदाज आहे. या स्तरातील मृद्भांडांमध्ये Northern Black Polished Ware, Black-Slipped Ware आणि विविध प्रकारच्या लाल मातीच्या भांडय़ांचा समावेश आहे. टेराकोटाच्या मुद्रा, हत्तीस्वारांच्या मूर्ती, मणी, प्राण्यांच्या प्रतिमा, खेळातील सोंगटय़ा, चक्र, गोफणगोळे, कानातील अलंकार आणि अस्थीपासून तयार केलेल्या वस्तू यांसारख्या अनेक वस्तूही मिळाल्या आहेत.

शुंगकालीन स्तरात मातीच्या विटा आणि दगडांनी बांधलेल्या वास्तूंचे अवशेष आढळतात. काही ठिकाणी जळालेल्या भागांचे पुरावेही मिळाले. लाल मातीच्या भांडय़ांबरोबरच करडय़ा आणि Black-Slipped Ware चा वापरही दिसतो. या स्तरातील पुराव्यांमध्ये तांब्याची नाणी, टेराकोटाच्या मुद्रा, मणी, पुरुष आणि स्त्राr प्रतिमा असलेल्या टेराकोटाच्या पट्टिका, दगडी वजन, अस्थीच्या वस्तू, प्राण्यांच्या टेराकोटा प्रतिमा, तांबे आणि लोखंडी वस्तू तसेच अर्ध-मौल्यवान दगडांचे व शंखाचे मणी यांचा समावेश आहे. कुषाणकालीन स्तरातून मिळालेले घराचे संकुल पुराणा किल्ल्याच्या वास्तू अभ्यासासाठी विशेष महत्त्वाचे आहे. या संकुलात तीन किंवा त्यापेक्षा अधिक खोल्यांचे अवशेष आहेत. भिंती मुख्यत भाजलेल्या विटांनी बांधलेल्या आहेत.

गुप्तकालीन स्तराची वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे भाजलेल्या विटांनी बांधलेल्या वास्तू आणि विटा व जेलीचे मिश्रण असलेल्या फरश्या. दोन ठिकाणी अशा फरश्यांचे अवशेष आढळले आहेत. लाल मातीच्या भांडय़ांमध्ये विविध प्रकारच्या वाटय़ा, साठवणीची भांडी आणि इतर पात्रे आढळतात. या काळातील पुराव्यांमध्ये टेराकोटाच्या मुद्रा, कापड आणि मृद्भांडांवर ठसे उमटविण्यासाठी वापरल्या जाणाऱया टेराकोटाच्या मुद्रा, खेळातील वस्तू, मानवी, प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या प्रतिमा, मणी तसेच गजलक्ष्मीची टेराकोटा प्रतिमा यांचा समावेश आहे. ‘ब्रह्मवर्त’ असा संस्कृत लेख असलेली टेराकोटाची मुद्रा या स्तरातील उल्लेखनीय वस्तू आहे.

गुप्तोत्तर काळात विटांच्या तुकडय़ांनी बांधलेल्या भिंतींचे अवशेष आढळले. त्यापैकी एका भिंतीशी संबंधित टेराकोटाचे डॅबर सापडले असून त्यापैकी एका वस्तूवर ब्राह्मी लिपीतील लेख आहे.

राजपूतकालीन स्तरातून अर्धवट घडवलेल्या दगडांनी बांधलेली एक मोठी भिंत सापडली. तिची जाडी पाहता ती संभाव्य तटबंदीचा भाग असावी, असा उत्खननकर्त्यांचा अंदाज आहे. या स्तरातील सर्वात उल्लेखनीय पुराव्यांपैकी एक म्हणजे वैकुंठ विष्णूची उभी दगडी प्रतिमा, जिचे प्रतिमा शास्त्रीय वैशिष्टय़ उत्खनन अहवालात विशेष महत्त्वाचे मानले आहे. राजपूत आणि सुलतानकालीन संक्रमण स्तरातून गणेशाची प्रतिमाही सापडली. सुलतानकालीन स्तरातून दगडी भिंती आणि चुन्याच्या जमिनींचे अवशेष सापडले. या काळातील प्रमुख पुरातत्त्वीय निदर्शक म्हणजे ग्लेझ्ड वेअर. मुघलकालीन स्तर हे उत्खननातील वरचे ऐतिहासिक थर आहेत. त्यातून निळ्या-पांढऱ्या रंगातील पोर्सिलीन, काचेच्या बाटल्यांचे अवशेष, चिलम, हुक्क्याशी संबंधित मृद्भांडी आणि विविध प्रकारची लाल मातीची भांडी मिळाली. या स्तरातील इतर पुराव्यांमध्ये दगडी वास्तु-अवयव, टेराकोटाच्या मानवी व प्राण्यांच्या प्रतिमा, लहान आकाराची गणेश प्रतिमा, अर्ध-मौल्यवान दगडांचे व काचेचे मणी आणि तांब्याची नाणी यांचा समावेश आहे.

पुराणा किल्ल्याच्या उत्खननातून समोर येणारे चित्र हे एका दीर्घकालीन मानवी वस्तीचे आहे. मौर्यपूर्व काळातील झाल्या पासून मौर्यकालीन जलव्यवस्था, शुंगकालीन वास्तू, कुषाणकालीन घरसंकुल, गुप्तकालीन विटा व जेलीचे मिश्रण असलेल्या फरश्या, गुप्तोत्तर काळातील संभाव्य कारागीर वस्ती, राजपूतकालीन संभाव्य तटबंदी, सुलतानकालीन ग्लेझ्ड मृद्भांडी आणि मुघलकालीन पोर्सिलीनपर्यंत प्रत्येक सांस्कृतिक स्तर दिल्लीच्या बदलत्या भौतिक संस्कृतीची वेगळी साक्ष देतो.

पुराणा किल्ल्याशी संबंधित इंद्रप्रस्थाचा प्रश्न मात्र स्वतंत्रपणे आणि सावधपणे पाहण्याची आवश्यकता आहे. उत्खननातून मौर्यपूर्व स्तर आणि झ्उं चे पुरावे निश्चितपणे मिळाले आहेत. इ.स.पू. 540 पर्यंतचे कालमापन या स्थळाच्या प्राचीनतेचा महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच झ्उं, जलमग्नतेचा संभाव्य थर आणि महाभारताशी संबंधित स्थळांच्या संदर्भातील पूर्वीच्या पुरातत्त्वीय अभ्यासामुळे या स्थळाबाबत प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु उपलब्ध पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे पुराणा किल्ल्याची इंद्रप्रस्थशी ओळख अंतिम आणि निर्विवादपणे सिद्ध झालेली आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण नैसर्गिक मातीपर्यंत उत्खनन झालेले नाही आणि सर्वात प्रारंभिक वस्तीचा संपूर्ण संदर्भ अद्याप ज्ञात झालेला नाही. यामुळे पुराणा किल्ल्याचे खरे पुरातत्त्वीय महत्त्व केवळ इंद्रप्रस्थाच्या शोधापुरते मर्यादित राहत नाही. या स्थळाने दिल्लीच्या इतिहासातील अनेक सांस्कृतिक टप्पे आपल्या मातीमध्ये जतन करून ठेवले आहेत. उत्खननातून मिळालेली नऊ स्तरांची सांस्कृतिक मालिका दिल्लीच्या दीर्घकालीन वस्तीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे उत्खनन अद्याप नैसर्गिक मातीपर्यंत पोहोचलेले नसल्यामुळे या टेकडीच्या सर्वात प्राचीन इतिहासाचा शोध अजून पूर्ण झालेला नाही.

पुराणा किल्ला म्हणून आज आपल्या समोर उभे असलेले स्मारक हे प्रत्यक्षात एका प्रदीर्घ पुरातत्त्वीय प्रक्रियेचा केवळ वरचा थर आहे. त्याखाली मौर्यपूर्व मृद्भांडींपासून मौर्यकालीन जलव्यवस्था, कुषाणकालीन वास्तू, गुप्तकालीन बांधकामे, राजपूतकालीन संरचना आणि सुलतान-मुघल काळातील भौतिक संस्कृतीपर्यंत दिल्लीच्या इतिहासाचे अनेक स्तर दडलेले आहेत. म्हणूनच पुराणा किल्ल्याचे उत्खनन हे एखाद्या एका राजवंशाचा किंवा एका ऐतिहासिक घटनेचा शोध नसून दिल्लीच्या दीर्घकालीन सांस्कृतिक आणि नागरी इतिहासाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया आहे.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)