
>> रितेश पोपळघट
[email protected]
शेती केवळ उपजीविकेचे साधन न राहता एक पूर्ण विकसित उद्योग व्यवस्था उभी करायची असेल तर शेतकऱ्याने शेतीतील अर्थकारण, व्यवस्थापन, तंत्रज्ञान या साऱ्याचा अभ्यास केला पाहिजे. यशस्वी कृषी उद्योगांचे यश संपूर्ण कृषी मूल्यसाखळी समजून घेण्यातच आहे.
भारतीय शेतकरी मेहनती आहे, कष्टाळू आहे, जमिनीशी जोडलेला आहे. मात्र आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ कष्ट करून शेतीत यश मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. कारण शेती आता केवळ उपजीविकेचे साधन राहिलेली नाही, ती एक पूर्ण विकसित उद्योग व्यवस्था बनत आहे. उद्योग म्हणून शेतीकडे पाहायचे असेल, तर शेतकऱयाला फक्त उत्पादन पद्धती पुरतेच ज्ञान पुरणार नाही. त्याला व्यवस्थापन, अर्थकारण, बाजारपेठ, तंत्रज्ञान, नेतृत्व, आरोग्य आणि मानसिक सक्षमता अशा अनेक विषयांचे सखोल ज्ञान आत्मसात करावे लागणार आहे.
आज जगभरातील यशस्वी कृषी उद्योगांकडे पाहिले, तर त्यांचे यश केवळ उत्पादनक्षमतेमुळे आलेले नाही. त्यांनी संपूर्ण कृषी मूल्यसाखळी समजून घेतली आहे. कोणते वाण निवडायचे, जमिनीचे व्यवस्थापन कसे करायचे, सिंचनाची कार्यक्षम पद्धत कोणती, पिकांच्या वाढीमागील वनस्पती शरीरक्रिया काय आहेत, पोषण व्यवस्थापन कसे करायचे, रोग व कीड नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना कशा करायच्या, छाटणी व कॅनोपी व्यवस्थापनाचा उत्पादनावर काय परिणाम होतो, याचे त्यांना सखोल ज्ञान असते किंवा त्यासाठी विविध प्रकारचे तज्ञ याकरिता काम करत असतात. आधुनिक शेतीत प्रत्येक निर्णय हा विज्ञानाधारित असणे आवश्यकच आहे. अंदाजावर किंवा परंपरेवर आधारित निर्णय आता फार काळ टिकू शकत नाहीत, जे सध्या भारतीय शेतीमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येतात.
भारतातील अनेक शेतकरी अजूनही उत्पादन वाढवण्यावरच लक्ष केंद्रित करतात, परंतु व्यवसायाच्या भाषेत सांगायचे तर उत्पादन हे केवळ एक अंग आहे, नफा हा अंतिम परिणाम असतो. एखाद्या शेतकऱ्याने भरघोस उत्पादन घेतले, पण उत्पादन खर्च, बाजारभाव, वाहतूक, साठवणूक आणि विक्री यांचा योग्य विचार केला नाही, तर शेवटी त्याच्या हातात अपेक्षित नफा उरत नाही. त्यामुळे शेतीमध्ये आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतातील आणि वैयक्तिक खर्च वेगळे ठेवणे, पैशाचा प्रवाह समजून घेणे, गुंतवणुकीचे नियोजन करणे, जोखीम व्यवस्थापन करणे आणि उपलब्ध भांडवलाचा प्रभावी वापर करणे, ही प्रत्येक कृषी उद्योजकाची मूलभूत कौशल्ये झाली पाहिजेत, पण यातील बऱयापैकी कौशल्ये अगदी चांगल्या म्हणणाऱया शेतकरी बांधवांकडेदेखील नसतात.
आजच्या जागतिक बाजारपेठेत उत्पादन विकणे हे उत्पादन घेण्याइतकेच महत्त्वाचे ठरले आहे. अनेक शेतकरी उत्कृष्ट उत्पादन घेतात. मात्र योग्य बाजारपेठेची माहिती नसल्यामुळे त्यांना अपेक्षित दर मिळत नाही. बाजारातील संधी, ग्राहकांच्या गरजा, निर्यात बाजारपेठेचे निकष, गुणवत्ता मानके आणि विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता यांचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. जागतिक दर्जाचे उत्पादन घ्यायचे असेल, तर GlobalG.A.P., अवशेषमुक्त उत्पादन, ट्रेसिबिलिटी आणि अन्नसुरक्षा मानकांचा अभ्यास करावा लागतो. शेतीतील स्पर्धा आता गाव किंवा तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, ती जागतिक पातळीवर पोहोचली आहे हे समजून घेणे आता महत्त्वाचे असणार आहे.
कृषी क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन. काढणीनंतरचे नुकसान हे भारतीय शेतीसमोरील मोठे आव्हान आहे. उत्पादन शेतातून बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक टप्पे पार करावे लागतात. योग्य काढणी, वर्गीकरण, पॅकिंग, साठवणूक, वाहतूक आणि विक्री यांचे नियोजन नसेल, तर उत्पादनाचा दर्जा आणि नफा दोन्ही घटतात. त्यामुळे शेतकऱयाने मूल्यसाखळीची संपूर्ण समज विकसित करणे आवश्यक आहे. आज वैयक्तिक शेतीपेक्षा समूह शेती, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकार क्षेत्रातील उपक्रम आणि सामूहिक विपणन यांना अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. कारण जगभरात मूल्यसाखळी आधारित कॉर्पोरेट शेती केली जात आहे. त्यातून त्यांना अधिक नफा मिळतो आहे.
शेती उद्योगाचा सर्वात दुर्लक्षित, पण अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास. अनेक वेळा तांत्रिक ज्ञान असूनही शेतकरी प्रगती करू शकत नाही. कारण निर्णयक्षमता, नेतृत्व, संवादकौशल्य आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांचा अभाव असतो. एक यशस्वी कृषी उद्योजक सतत प्रश्न विचारतो, समस्यांचे मूळ समजून घेतो, पर्यायांचा विचार करतो आणि योग्य निर्णय घेण्याचे धैर्य दाखवतो. चुकांचे विश्लेषण, व्यवसाय आराखडा तयार करणे, वेळेचे व्यवस्थापन, मजूर व्यवस्थापन आणि स्वतचा ब्रँड निर्माण करणे, ही कौशल्ये आधुनिक शेतकऱयाने शिकणे गरजेचे बनले आहे.
विशेषत डिजिटल युगात तंत्रज्ञानापासून दूर राहणे म्हणजे स्पर्धेत मागे पडणे होय. मोबाईल अॅप्स, फार्म मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, हवामान अंदाज प्रणाली, सेन्सर-आधारित सिंचन, ड्रोन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर शेतीमध्ये झपाटय़ाने वाढत आहे. उद्याचा यशस्वी शेतकरी तोच असेल, जो डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करून माहितीच्या आधारे निर्णय घेईल.
परंतु या सर्वांपेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे मानसिक आणि शारीरिक आरोग्य. शेती हा नैसर्गिक अनिश्चिततेशी सतत सामना करणारा व्यवसाय आहे. हवामान बदल, बाजारातील चढउतार, मजुरांची कमतरता आणि आर्थिक दबाव यामुळे शेतकरी अनेकदा मानसिक तणावाखाली असतो. त्यामुळे आत्मपरीक्षण, सकारात्मक विचार, तणाव व्यवस्थापन, योग, ध्यान आणि निरोगी जीवनशैली यांचाही अभ्यास तितकाच आवश्यक आहे. कारण निरोगी मन आणि निरोगी शरीराशिवाय कोणताही उद्योग दीर्घकाळ यशस्वी होऊ शकत नाही.
खरे तर शेतीला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी केवळ सरकारी धोरणे किंवा अनुदाने पुरेशी नाहीत. त्यासाठी शेतकऱ्याच्या विचारसरणीत बदल होणे आवश्यक आहे. ‘मी उत्पादक आहे’ या मानसिकतेतून बाहेर पडून ‘मी कृषी उद्योजक आहे’ ही ओळख निर्माण करावी लागेल. उद्योगपती जसा बाजार, वित्त, मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांचा अभ्यास करतो, तसाच अभ्यास शेतकऱ्यालाही करावा लागेल.
आगामी काळात शेतीत टिकून राहायचे असेल, तर ज्ञान हीच सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. जमीन, पाणी आणि भांडवल यांची मर्यादा असू शकते, पण शिकण्याची मर्यादा नसते. जो शेतकरी पिकांसोबत व्यवस्थापन, अर्थशास्त्र, विपणन, नेतृत्व आणि तंत्रज्ञान शिकेल, तोच खऱया अर्थाने शेतीला उद्योगात रूपांतरित करू शकेल आणि त्या दिवशी भारतीय शेतकरी केवळ ‘अन्नदाता’ म्हणून नव्हे, तर ‘यशस्वी उद्योजक’ म्हणून ओळखला जाईल.
(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून
‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)

























































