हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर; १६६१ कोटींचे नुकसान, २९६ जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशला निसर्गाच्या कोपाचा मोठा सामना करावा लागला आहे. ३० जून ते ११ सप्टेंबर या ७४ दिवसांच्या कालावधीत राज्यात अतिवृष्टी, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य आपत्कालीन कार्य नियंत्रण केंद्राच्या अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये राज्याचे आतापर्यंत १६६१.९७ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, तब्बल २९६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

या ७४ दिवसांच्या काळात ११९ मृत्यू हे थेट नैसर्गिक आपत्तींमुळे झाले आहेत, तर इतर १७७ लोकांचा मृत्यू अतिवृष्टीच्या काळात झालेल्या रस्ते अपघातांमध्ये झाला आहे. याशिवाय ५२० जण जखमी झाले आहेत आणि ५२१ पाळीव प्राणी व ५२१ कोंबड्यांचाही या आपत्तीत बळी गेला आहे. या संकटात राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वाधिक फटका बसला असून, त्यांच्या पायाभूत सुविधांचे १२३१.५९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ते खचणे, संरक्षण भिंती कोसळणे आणि पूल वाहून जाणे यामुळे हा आकडा आणखी वाढून १५०० ते १६०० कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागानंतर ऊर्जा विभागाचे सर्वाधिक ३६८.६८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यासह कृषी, फलोत्पादन, ग्रामीण विकास आणि पशुसंवर्धन यांसारख्या विविध विभागांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरत असला तरी, १२ सप्टेंबरपर्यंत राज्यातील ६७ रस्ते अद्याप वाहतुकीसाठी बंद आहेत. यात सर्वाधिक ३६ रस्ते मंडी जिल्ह्यातील आहेत. तसेच राज्यातील १४२ ट्रान्सफॉर्मर्स प्रभावित झाल्याने काही भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, मान्सून आता परतीच्या वाटेवर असल्याने सरकारकडून रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती दिली जाणार आहे.