
धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढते तास आणि सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे आजकाल मानसिक ताणतणाव झपाट्याने वाढत आहे. अपुरी झोप, अयोग्य आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे चिडचिड, नैराश्य व चिंता (Anxiety) यांसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा थेट परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर तसेच कौटुंबिक व सामाजिक नातेसंबंधांवर होताना दिसत आहे. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानसिक आजारांशी झुंजणारे जवळपास 49 टक्के लोकं त्यांचा त्रास ठेवतात लपवून ठेवतात असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत सामाजिक उपक्रम आणि मानसिक आरोग्य सेवा प्रदाता एमपॉवरच्या नवीन सर्वेक्षणानुसार, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढत असली तरी हिंदुस्थानातील तरुण अजूनही भावनिक आव्हानांचा सामना करत आहेत.
“अनपॅक युअर इमोशनल बॅगेज: अ कॉल टू अॅक्शन फॉर यंग इंडियन्स टू सीक हेल्प ड्युरिंग इमोशनल डिस्ट्रेस” या शीर्षकाच्या सर्वेक्षणात हिंदुस्थानातील मुंबई, पुणे, दिल्ली एनसीआर, बंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूर या दहा प्रमुख भागांमधील १८ ते २५ वयोगटातील तरुणांकडून प्रतिसाद गोळा करण्यात आले. हे संशोधन तरुणांमधील भावनिक तणाव, त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची तंत्रे आणि त्रासाबाबतच्या सामाजिक प्रतिक्रियांचा शोध घेते. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि मदत घेण्याची त्यांची इच्छा किंवा क्षमता यांमधील एक व्यापक तफावत यातून स्पष्ट होते. मानसिक स्वास्थ्याविषयी सार्वजनिक चर्चा वाढल्या असल्या तरी एमपॉवर सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून दिसून आले आहे की, आपल्या देशातील फक्त ४९.५ टक्के तरुण अजूनही मानसिक ताण तणाव खुलेपणाने जाहीर करत नाहीत. तसेच या स्ट्रेससाठी वैद्यकीय उपचार, काऊन्सलिंग घेण्याचे टाळतात. या सर्वेक्षणात फक्त ९.२ टक्के व्यक्तींनी प्रोफेशनलकडून मदत मागितली आहे.
मदत घेण्याबाबतची ही अनिच्छा तरुणांच्या स्वतःच्या त्रासाला सामोरे जाण्याच्या पद्धतीपर्यंत देखील विस्तारलेली दिसते, जिथे ते प्रामुख्याने भावना लपवण्याचा प्रयत्न करतात. ४०.९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, ते ठीक नसतात तेव्हाही इतरांना ‘मी ठीक आहे’ असे सांगतात. अनेकांनी त्यांच्या भावनांबद्दलच्या चर्चा पूर्णपणे टाळल्याचे किंवा ते ज्या अनुभवातून जात आहेत त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी स्वतःला सतत व्यस्त ठेवल्याचे नमूद केले आहे.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मत व्यक्त करत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, एमपॉवरच्या संस्थापकीय अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या, “आम्ही संवाद साधलेल्या तरुणांपैकी चाळीस टक्के तरुणांना फक्त ‘प्रबळ राहा’ असे सांगण्यात आले आहे. केवळ नऊ टक्के तरुणांना प्रोफेशनलकडून मदत घेता आली. या दोन आकड्यांच्या दरम्यान कुठेतरी आपण त्यांना समजून घेण्यात अपयशी ठरत आहोत. आपण पाऊल उचलण्यापूर्वी एखादे संकट येण्याची वाट पाहत राहतो. यावरील उपाय म्हणजे अगदी सुरुवातीपासून शाळांमध्ये हे ओळखले पाहिजे, ज्यामुळे शांत राहणे हीच तरुणांना माहित असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची एकमेव पद्धत ठरणार नाही.”
























































