
माझ्या पसंतीचे घर, माझा चॉइस, या संकल्पेनुसार सिडकोने आणलेल्या ४ हजार ७७९ घरांची लॉटरी आज फुटली. त्यामुळे या भाग्यवंतांना नवी मुंबईत आपला हक्काचा निवारा मिळाला आहे. विजेत्या अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे आणि घरांची किंमत भरल्यानंतर त्यांना लगेच या घराचा ताबा देण्यात येणार आहे.
सिडकोच्या बेलापूर येथील मुख्यालयात ही सोडत काढण्यात आली. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल, गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, लक्ष्मीकांत गरजे, नरेंद्र भामरे, श्रीनिवास मोकळीकर तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घरांची सोडत काढल्यानंतर विजेत्या अर्जदारांची यादी सिडकोने सायंकाळी आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली. १५ ऑगस्ट रोजी या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता.
परवडणाऱ्या दरात घर
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना नवी मुंबईसारख्या नियोजित व जागतिक दर्जाच्या शहरात परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर उपलब्ध करून देणे, हा सिडकोच्या गृहनिर्माण उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे. या संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांचे गृहस्वप्न साकार होत असून पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशक गृहनिर्माणाच्या दिशेने सिडकोची वाटचाल सुरू आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांनी यावेळी व्यक्त केली.



























































