हैदराबादमधील लष्करी तळावरून AK-203 रायफल्स, पिस्तूल आणि 1900 जिवंत काडतुसांची चोरी; निवृत्त जवानाला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादमधील सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट भागातील बोल्हारम या कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या लष्करी तळावरून घातक शस्त्रे आणि काडतुसांची चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मद्रास रेजिमेंटच्या 20 व्या बटालियनच्या कोटे आणि मॅगझिन खोलीतून चार AK-203 रायफल्स, एक इन्सास रायफल, सात पिस्तूल, नाईट-व्हिजन बायनाक्युलर आणि तब्बल 1900 जिवंत काडतुसे लंपास करण्यात आली होती. या प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी लष्कराच्या एका निवृत्त हवालदाराला अटक करून संपूर्ण साठा जप्त केला आहे.

उप्पुथॉल्ला मल्लेष (वय – 37) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मल्लेष 2010 मध्ये सैन्यात भरती झाला होता आणि 30 जून 2026 रोजी तो रिटायर झाला होता. वेळेआधी मिळालेल्या निवृत्तीमुळे तो नाराज होता. याच असंतोषातून त्याने 30 आणि 31 ऑगस्टच्या मध्यरात्री ही धाडसी चोरी केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

तेलंगणाचे महासंचालक सी. व्ही. आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लेषने लष्करी तळावरून शस्त्रे चोरल्यानंतर ती सुरुवातीला एका मंदिराच्या परिसरात लपवून ठेवली. त्यानंतर तो स्वतःच्या घरातून कपड्यांची बॅग घेऊन पांढऱ्या रंगाच्या ब्रेझा कारने निघाला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी त्याने श्रीशैलम महामार्ग टाळून आऊटर रिंग रोड, सागर रिंग रोड आणि बंगळुरू गेट रोडचा वापर केला.

प्रवासादरम्यान आपल्यावर कोणी संशय घेऊ नये आणि आपण कामानिमित्त Achampet कडे जात आहोत असा पुरावा निर्माण करण्यासाठी त्याने रस्त्यात काही प्रवाशांना कारमध्ये बसवले. सागर रिंग रोड येथून चार प्रवाशांना गाडीत बसवून देवराकोंडा येथे सोडले आणि त्यांच्याकडून भाडे घेतले. त्यानंतर दिंडी परिसर येथून पुन्हा दोन प्रवाशांना बसवून पुढे सोडले. 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15 च्या सुमारास तो Achampet येथे पोहोचला.

सैन्यातून शस्त्रे गायब झाल्याची माहिती मिळताच तपास वेगाने सुरू झाला. तपासाची सुई मल्लेषवर वळल्याचे लक्षात येताच तो घाबरला आणि 6 सप्टेंबर रोजी त्याने शस्त्रांचा साठा दुसऱ्या ठिकाणी हलवला. मात्र, हैदराबाद टास्क फोर्सच्या पथकाने 10 सप्टेंबर रोजी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या निशानदेहीवरून चोरीला गेलेला सर्वच्या सर्व शस्त्रांचा साठा सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आला आहे. निवृत्तीच्या रागातूनच ही चोरी झाली की त्यामागे शस्त्रे विकण्याचा अथवा अन्य कोणताही गंभीर कट होता, या दृष्टीने हैदराबाद पोलीस आणि लष्करी यंत्रणा पुढील सखोल तपास करत आहेत.