
बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला जेडीएसचा (JDS) माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परप्पन अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात रेवण्णा याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि पेन ड्राईव्हच्या फॉरेन्सिक तपासणीत डझनभर अश्लील व्हिडिओ आणि वेब सिरीज आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांचा पुतणा असलेला प्रज्वल रेवण्णा सध्या बंगळुरूच्या परप्पन अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. ११ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारागृहातील अतिसुरक्षित बॅरेकमध्ये अचानक छापा टाकला होता. त्यावेळी रेवण्णा थेट मोबाईल फोन वापरताना रंगेहाथ पकडला गेला होता. तपास पथकाने त्याच्याकडून मोबाईल, चार्जर, पेन ड्राईव्ह आणि एक वही जप्त केली होती.
फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक बाबी उघड
जप्त करण्यात आलेला मोबाईल आणि पेन ड्राईव्ह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. या फॉरेन्सिक अहवालानुसार, फोनमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील व्हिडिओ आणि पेन ड्राईव्हमध्ये वेब सिरीज डाऊनलोड केलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारागृहाच्या नियमांनुसार मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर पूर्ण बंदी असतानाही रेवण्णा याला ही सुविधा कशी उपलब्ध झाली, यावरून तुरुंग प्रशासनातील ‘व्हीआयपी’ संस्कृती आणि सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी एका कारागृह अधिकाऱ्याला आधीच निलंबित करण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.




























































