अमेरिकेने करारांचा आदर करावा, आमचा कूटनीती आणि संवादावर विश्वास; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्लीत सुरू असलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला आणि जागतिक समुदायाला महत्त्वाचा संदेश दिला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट केले की, इराणचा युद्ध किंवा लष्करी संघर्षावर नव्हे, तर कूटनीती आणि संवादावर दृढ विश्वास आहे. तसेच अमेरिकेने आक्रमक धोरणे सोडून आंतरराष्ट्रीय करारांचा आदर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असलेल्या अराघची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि अमेरिका-इराण तणावावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, आक्रमकतेतून काहीही साध्य होऊ शकत नाही, याची जाणीव आता अमेरिकेलाही झाली असावी. लष्करी कारवाईतून या प्रदेशात कधीही स्थैर्य प्रस्थापित होऊ शकत नाही. पश्चिम आशियातील तणाव आणि संघर्ष निवळण्यासाठी लष्करी पर्यायाचा वापर न करता केवळ कूटनीती आणि संवादाचा मार्ग स्वीकारणे हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या महत्त्वपूर्ण ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान हेदेखील दिल्लीत दाखल झाले असून, या दौऱ्यात दोन्ही देशांचे प्रतिनिधी जागतिक शांततेसाठी चर्चा करत आहेत.