
>> सुजाता बाबर
[email protected]
शनीचा उपग्रह टायटनच्या ध्रुवीय प्रदेशांमध्ये अशा द्रव साठय़ांचे मोठे प्रमाण आढळते. टायटनवरील या नद्या संशोधकांसाठी कायम आव्हान ठरल्या आहेत.
नदी म्हटले की डोळ्यांसमोर वाहते पाणी, हिरवीगार काठची झाडे आणि समुद्राकडे जाणारा प्रवाह उभा राहतो. पण आपल्या सौरमालेत एक असे जग आहे, जिथे नद्या आहेत, तलाव आहेत, समुद्र आहेत आणि पाऊसही पडतो, मात्र या सगळ्यांत पाणी मुख्य घटक नाही. शनीचा सर्वात मोठा उपग्रह टायटन हा पृथ्वीनंतर आपल्या सौरमालेतील असा एकमेव ज्ञात जग आहे, जिथे द्रव पदार्थाचे वातावरणातून पृष्ठभागावर आणि पुन्हा वातावरणात जाणारे चक्र स्पष्टपणे दिसते. या चक्रात पाण्याऐवजी मिथेन आणि इथेन महत्त्वाची भूमिका बजावतात.
टायटनचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्याचे दाट वातावरण. त्याच्या वातावरणात मुख्यत नायट्रोजन असून मिथेनचे प्रमाणही महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाशामुळे आणि वातावरणातील प्रक्रियांमुळे पृष्ठभागावरील द्रव मिथेन बाष्पीभवन होते, त्यातून ढग तयार होतात आणि योग्य परिस्थितीत मिथेनचा पाऊस पृष्ठभागावर पडतो. हा पाऊस वाहत जाऊन दऱया, प्रवाह आणि नदीसदृश मार्ग तयार करतो. एक महत्त्वाचा फरक आहे. टायटनच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे उणे 179 अंश सेल्सिअस असल्याने तेथील पाणी गोठून अत्यंत कठीण बर्फासारखे असते. परंतु मिथेन आणि इथेनसारखे हायड्रोकार्बन त्या अत्यंत थंड वातावरणात द्रवरूपात राहू शकतात. त्यामुळे पृथ्वीवर पाणी जे काम करते, त्यासारखे भौगोलिक कार्य टायटनवर द्रव मिथेन-इथेन करू शकतात. ते पृष्ठभागावरील पदार्थ झिजवतात, वाहून नेतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी साचवतात.
शनीभोवती फिरणाऱ्या कॅसिनी या अवकाशयानाच्या निरीक्षणांमधून टायटनवर असंख्य नदीसदृश वाहिन्या, खोल दऱ्या आणि द्रवाने भरलेले तलाव व समुद्र असल्याचे स्पष्ट झाले. विशेषत टायटनच्या ध्रुवीय प्रदेशांमध्ये अशा द्रव साठय़ांचे मोठे प्रमाण आढळते. ‘क्रॅकेन मेअर‘, ‘लिजिया मेअर‘ आणि ‘पुंगा मेअर‘ ही याची प्रमुख उदाहरणे आहेत. काही नदीपात्रे या समुद्रांपर्यंत पोहोचताना दिसतात; यावरून टायटनवरील द्रव मिथेन आणि इथेनच्या स्थानिक व प्रादेशिक चक्राच्या परिणामकारकतेची कल्पना येते. टायटनवरील नदीकाठ मात्र पृथ्वीवरील नदीकाठासारखे हिरवेगार नाहीत. तेथे द्रवाच्या प्रवाहामुळे बर्फाळ पृष्ठभागाची झीज होते. टायटनवरील पाण्याचा बर्फ हा इतक्या कमी तापमानात कठीण खडकासारखा वागू शकतो. त्यावर खाली येणारे सेंद्रिय कण साचतात आणि कालांतराने वेगवेगळ्या प्रकारचे भूआकार तयार होतात. त्यामुळे टायटनचा भूभाग पाहताना तो काही प्रमाणात पृथ्वीसारखा वाटतो, परंतु त्याची रासायनिक आणि भौतिक यंत्रणा वेगळी आहे.
टायटनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याचे वातावरण आणि पृष्ठभाग यांच्यातील गुंतागुंतीचे रसायनशास्त्र. सूर्यप्रकाश आणि शनीच्या चुंबकीय वातावरणातून येणाऱया ऊर्जेमुळे मिथेनचे रेणू तुटतात आणि त्यातून विविध सेंद्रिय संयुगे तयार होतात. यातील काही पदार्थ वातावरणातून खाली येऊन पृष्ठभागावर साचतात. त्यामुळे टायटन हा केवळ विचित्र नद्यांचा उपग्रह नाही, तर सेंद्रिय रसायनांनी समृद्ध असलेली नैसर्गिक प्रयोगशाळाच आहे. टायटनवर द्रवरूप मिथेनचे चक्र असल्यामुळे तेथे ऋतूंनुसार बदलही होतात. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे 29.5 पृथ्वीवर्षे लागतात. त्यामुळे टायटनवर ऋतू पृथ्वीपेक्षा खूप हळूहळू बदलतात. दीर्घ काळात ढगांचे स्वरूप, पावसाचे प्रमाण आणि द्रव साठय़ांचे वितरण बदलू शकते. काही भागांत पावसामुळे तयार झालेल्या वाहिन्या दिसतात, तर काही भाग कोरडे आणि विस्तीर्ण आहेत.
टायटनवर आजपर्यंत जीवन आढळल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही तेथे मुबलक सेंद्रिय संयुगे, द्रवांचे सक्रिय चक्र आणि पृष्ठभागाखाली द्रवरूप पाण्याचा महासागर असण्याची शक्यता असल्यामुळे हा उपग्रह वैज्ञानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भविष्यातील ड्रगनफ्लाय मोहीम टायटनच्या पृष्ठभागावर विविध ठिकाणी जाऊन तेथील रसायनशास्त्र आणि संभाव्य जीवनपूर्व प्रक्रियांचा अधिक सखोल अभ्यास करण्याची अपेक्षा आहे. पृथ्वीवरील नदी आपल्याला पाण्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देते; टायटनवरील नदी मात्र निसर्गाचे नियम वेगळ्या परिस्थितीत किती विलक्षण रूप धारण करू शकतात हे दाखवते. तिथे पाणी खडकासारखे कठीण आहे, मिथेन पावसाचे रूप घेते आणि त्याच मिथेनच्या प्रवाहांनी दऱ्या व नदीवाहिन्या तयार होतात. पृथ्वीपासून तब्बल कोटय़वधी किलोमीटर दूर असलेला टायटन त्यामुळे केवळ शनीचा उपग्रह राहत नाही; तो पृथ्वीच्या परिचित जलचक्राची एका वेगळ्या रसायनशास्त्रात घडलेली अद्भुत, परग्रहावरील आवृत्ती बनतो.
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)
























































