
>> आशुतोष बापट, [email protected]
मराठवाडा ही संतांची भूमी, मंदिरांची भूमी, विविध प्राचीन राजवटींच्या राजधानींची भूमी. मराठवाडा हा खरंच सुंदर आहे, देखणा आहे, रमणीय आहे आणि वारसा स्थळांनी श्रीमंत आहे. इथे गावोगावी एखादे प्राचीन मंदिर आढळेल. इथे एकापेक्षा एक सुंदर अशा बारवा दिसतील. इथे कमालीच्या सुंदर, सुडौल आणि कमनीय अप्सरा मंदिरांवर कोरलेल्या आढळतील. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव अशा बलाढय़ राजसत्ता इथे नांदल्या. त्यांच्या वैभवाच्या खाणाखुणा आज मराठवाड्यात सर्वत्र विखुरलेल्या आहेत.
मराठवाड्यात बरेच भुईकोट किल्ले बघायला मिळतात. त्यातले बरेचसे मुघलकाळात बांधले गेल्याचे सांगितले जाते. त्यांची रचना तरी तशी दिसते. काही किल्ल्यांमध्ये जुनी देवळे पाडून त्यांचे अवशेष तटबंदीमध्ये बसवल्याचेसुद्धा दिसते. बीड जिह्यातला किल्ले धारूर हा असाच एक देखणा किल्ला. सकृतदर्शनी हा भुईकोट किल्ला वाटतो. कारण याच्या दरवाजापर्यंत थेट गाडी रस्ता गेलेला आहे, पण या किल्ल्याच्या दुसऱया बाजूला गेले की खाली दरी दिसते. त्यामुळे याला गिरिदुर्गसुद्धा म्हणता येईल किंवा मिश्रदुर्ग म्हणता येईल. हा किल्ला आणि यावर असलेले बांधकाम बघून हा किल्ला इस्लामी स्थापत्याचा नमुना आहे हे जाणवते. अर्थात त्याचा इतिहास निराळाच आहे. या भागावर राज्य करणाऱया राष्ट्रकूट राजांनी इ. सनाच्या 8 व्या शतकात धारूरला हा बलदंड किल्ला बांधला आणि त्याचे नाव ‘महादुर्ग’ असे ठेवले. त्या वेळी बांधलेला किल्ला हा काही आज दिसतो तसा नव्हता. अगदी साधी तटबंदी बांधण्यात आली होती. राष्ट्रकुटांच्या नंतर यादव घराण्याची राजवट इथे होती.
पुढे यादवांच्या नंतर आलेल्या बहमनी राजवटीचीसुद्धा पाच शकले झाली आणि पाच शाह्या निर्माण झाल्या. त्यातल्या औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर ही राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यात धारूर, उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. बरीदशाही नष्ट करण्यासाठी आदिलशाही, निजामशाही आणि कुतूबशाही या तीनही शाह्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यामुळे या काळात या किल्ल्यांच्या परिघात अनेक लढाया झाल्या. बरीदशाहीच्या पाडावानंतर धारूरच्या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आदिलशहाचा सरदार किश्वरखान लारी याने जुन्या ‘महादुर्गा’च्या जागी त्याचेच दगड वापरून नवीन किल्ला बांधला तोच आजचा धारूरचा किल्ला होय.
दोन्ही शाह्यांमध्ये या किल्ल्यासाठी लढाया झाल्या आहेत. 1569 मध्ये धारूरच्या किल्ल्यावर निजामशहाने मोठा हल्ला केला. त्या वेळी किल्ल्यात 5000 सैन्य होते, पण या लढाईत किश्वरखानाचा पराभव झाला आणि हा किल्ला निजामशहाकडे गेला. त्याने किल्ल्याचे नाव ‘फतेहबाद’ असे ठेवले. पुढे इ. स.1630-31 मध्ये शहाजहानचा सेनापती आझमखानाने धारूर किल्ला ताब्यात घेतला. या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने एक नाणे काढले. धारूरच्या किल्ल्यात मोघलांची मोठी टांकसाळ होती. शहाजहाननंतर जहांदारशहापर्यंत 100 वर्षे या किल्ल्यातील टाकसाळीतून नाणी पाडली जात होती. शिवकाळातसुद्धा या किल्ल्याचा उल्लेख येतो. पन्हाळ्याच्या युद्धाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या मतभेदानंतर नेताजी पालकर मोगलांना जाऊन मिळाले. तेव्हा ते धारूरच्या किल्ल्यात राहायला होते. शिवाजी महाराजांनी आग्रा येथून ऐतिहासिक सुटका करून घेतल्यावर पलायन केल्यावर औरंगजेबाच्या आदेशानुसार जयसिंगाने नेताजी पालकरला धारूरच्या किल्ल्यात अटक केली. 11 मार्च 1795 ला झालेल्या खडर्य़ाच्या लढाईनंतर धारूर किल्ला काही काळ मराठय़ांच्या ताब्यात होता. त्यानंतर हा किल्ला निजामाने पुन्हा जिंकून घेतला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत धारूर किल्ला निजामाच्या ताब्यात होता.
धारूरचा किल्ला आहे मोठा देखणा. 35 एकर एवढय़ा भूभागावर पसरलेला हा किल्ला बहुदा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा किल्ला असावा. किल्ल्याला बाहेरून एक मोठा खंदक आहे. त्याचा बराचसा भाग आता बुजला आहे. किल्ल्याला विविध आकारांचे बुरूज आहेत. ते खूप अवाढव्य आहेत. त्यातल्या एका अष्टकोनी बुरुजाला हत्ती बुरूज म्हणतात. त्यावर हत्ती आणि त्याच्या बाजूला दोन शरभांचे शिल्पांकन केलेले आहे. तिथेच वरच्या बाजूला देवनागरीसह इतर दोन लिपींमध्ये एक शिलालेख कोरलेला दिसतो. किल्ल्यात प्रवेश करताना असलेल्या बुरुजावरसुद्धा एक शिलालेख कोरलेला आहे. इथून प्रवेश केल्यावर पहारेकऱयांसाठी काही देवड्या बांधल्या आहेत. यातल्या प्रत्येक देवडीच्या छताचे नक्षीकाम वेगळे आणि सुंदर आहे. ही सगळे काम चुन्यात केलेली दिसतात. किल्ल्यात पाण्याचे दोन मोठे तलाव असून त्यात अगदी उन्हाळ्यातसुद्धा पाणी असते. किल्ल्याचा आवाका लक्षात घेता त्या वेळी किल्ल्यावर दोन पाचशे लोक सहज वस्तीला असणार यात शंका नाही. त्यांच्या पाण्याची सोय या मोठय़ा तलावातल्या पाण्याने होत असणार.
किल्ल्यावरून आजूबाजूचा भव्य प्रदेश नजरेस पडतो. धारूर ही कायमच एक मोठी बाजारपेठ राहिल्याने या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व असणार यात शंका नाही. आजही धारूर हे सीताफळ आणि खवा यासाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. इतके देखणे स्थापत्य मराठवाड्यात वसले आहे तरी त्याची फारशी ओळख पर्यटकांना नाही. त्यामुळे इथे एवढय़ा मोठय़ा किल्ल्यावर अगदी बोटावर मोजतील इतकीच माणसे असतात. खरे तर लातूर, अंबेजोगाई, बीड इथून हे स्थान जवळ आहेत. मराठवाड्याच्या भटकंतीमध्ये किल्ले धारूरचा समावेश अवश्य करायला हवा. इतके सुंदर स्थापत्य तिथे जाऊन जवळून बघायला हवे.




























































