
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र ‘बिलॉन्गिग – अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हार्परकॉलिन्स इंडियाद्वारे 10 नोव्हेंबर रोजी हे पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक प्रकाशित होताना सुरूवातीपासूनच चर्चेत राहिले आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रथम हे पुस्तक प्रकाशित करण्याची घोषणा केली आणि काहीच दिवसात माघारही घेतली. हस्तलिखितातील काही भागांमध्ये संपादकीय बदल करण्यावरून झालेल्या मतभेदामुळे हे पुस्तक प्रकाशित न करण्याचा निर्णय पीआरएचआयने घेतला होता. पुस्तकात मोदी सरकारच्या काळात चीनने भारतीय भूभागावर मिळवलेल्या कथित ताब्याविषयी संबंधित भाग वगळण्यावरून हे मतभेद झाले होते. पेंग्विन रँडम हाऊसच्या भारतातील संस्थेकडून प्रकाशित होत नसले तरी ठरल्याप्रमाणे याची आंतरराष्ट्रीय आवृत्ती पेंग्विन रँडम हाऊसच्या अल्फ्रेड ए. नॉफ यांच्या प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित होणार आहे. पंतप्रधान मोदी, त्यांच्या बारा वर्षाच्या कार्यकाळाचे संदर्भ, आरएसएसची भूमिका, जातीय संघर्ष आणि दंगली, देशातील अल्पसंख्यांकांची सद्यस्थिती याबाबत स्पष्ट भूमिका घेणारे हे पुस्तक आहे. हे केवळ राजकीय आत्मचरित्र नाही तर प्रेम, कर्तव्य, ओळख यांसह घडलेला एका व्यक्तिमत्वाचा हा प्रवास आहे, असे हार्परकॉलिन्स इंडियाने म्हटले आहे.
























































