मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये ४ जणांचा मृत्यू, एक महिला बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची एक मोठी घटना समोर आली आहे. रविवारी मणिपूरच्या तामेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यांमध्ये दोन वेगवेगळे हल्ले झाले. या सशस्त्र हल्ल्यांमध्ये ४ कुकी नागरिकांचा मृत्यू झाला असून एक महिला बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना एल टोलन आणि लाँगपी या गावांमध्ये घडली. या हल्ल्यांमागे NSCN (IM) आणि ZUF (K) या सशस्त्र गटांच्या संशयित सदस्यांचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनंतर परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि सुरक्षा दले परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

विशेष बाब म्हणजे, कुकी समुदायाकडून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. १९९० च्या दशकात झालेल्या जातीय हिंसाचारात ज्या निष्पाप लोकांनी जीव गमावला आणि जे लोक विस्थापित झाले, त्यांच्या स्मरणार्थ कुकी समाज दरवर्षी हा काळा दिवस पाळतो. या दुःखद दिवशीच हे हल्ले झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.