Wimbledon 2026 – घरापासून अवघ्या 5 किमीवर हल्ले; मानसिक धक्क्यातून सावरत युक्रेनच्या मार्ताची ऐतिहासिक कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनची स्टार टेनिस खेळाडू मार्ता कोस्ट्युक विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतानाच तिकडे तिच्या मायभूमीत युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाकडून पुन्हा एकदा भीषण क्षेपणास्त्र हल्ले सुरू होते. या विदारक परिस्थितीतही मन घट्ट करून कोस्ट्युकने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र, या यशाच्या आनंदासोबतच तिच्या मनात आपल्या देशातील परिस्थितीबद्दल प्रचंड संताप आणि वेदना आहेत. युक्रेनवर झालेल्या ताज्या रशियन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रशियन खेळाडूंच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावर कोस्ट्युकने अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.

सोमवारी रशियन क्षेपणास्त्रांनी कीव्हमधील निवासी इमारतींना लक्ष्य केले. हा परिसर कोस्ट्युकच्या पालकांच्या घरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. या मानसिक धक्क्यातून सावरत तिने चौथ्या फेरीचा सामना खेळला आणि जिंकला. तत्पूर्वी, गेल्या आठवड्यातही रशियाने कीव्हवर 11 तास सलग ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला होता. या हल्ल्यात 21 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, चौथ्या फेरीतील सामना जिंकल्यानंतर मार्ताने पत्रकारांशी संवाद साधला. युद्धाच्या या भयंकर परिस्थितीपासून स्वतःला पूर्णपणे बाजूला ठेवणे अजिबात सोपे नाही. गेल्या आठवड्यात जेव्हा पहिला मोठा हल्ला झाला, तेव्हा माझ्यासाठी तो काळ अत्यंत कठीण होता. त्यानंतर सोमवारी आमच्या घराजवळील चार निवासी रस्ते उद्ध्वस्त करण्यात आले. अनेक निष्पाप लोक आणि लहान मुले मारली गेली. मी देशातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे, पण खेळताना या गोष्टींचा माझ्या कामगिरीवर परिणाम होऊ नये, असा माझा प्रयत्न असतो, असे ती म्हणाली.

इटलीच्या जास्मिन पाओलिनीचा पराभव

12 व्या मानांकित मार्ता कोस्ट्युकने उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या जास्मिन पाओलिनीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत पहिल्यांदाच विम्बल्डनच्या अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. कोस्ट्युकची ग्रँड स्लॅममधील ही सलग दुसरी उपांत्य फेरी आहे. यापूर्वी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत तिला रशियाच्या मिरा अंद्रेव्हाकडून पराभव पत्करावा लागला होता.

जोकोविचचा ऐतिहासिक महासंग्राम! विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ उपांत्यपूर्व लढत जिंकली, 14 वर्षांनी लहान फेलिक्सला नमवत विक्रमांची बरसात

आयओसीच्या निर्णयावर संताप

2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियन खेळाडूंना टेनिस आणि इतर खेळांमध्ये तटस्थ खेळाडू म्हणून खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, मंगळवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रशियावरील बंदी तात्पुरती उठवत विविध खेळांच्या संघटनांना रशियन खेळाडूंची तटस्थ ही अट काढून टाकण्याची शिफारस केली. रशियन सरकारने या निर्णयाचे स्वागत करत हे सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. मात्र कोस्ट्युकने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. माझ्या मते हा निर्णय अत्यंत भयंकर आहे. केवळ युक्रेनसाठीच नाही, तर खेळात सहभागी असणाऱ्या सर्वच देशांसाठी हा निर्णय फेअर प्लेच्या तत्त्वांना हरताळ फासणारा आहे. मी या निर्णयाशी 100 टक्के असहमत आहे. आता ऑलिम्पिकमध्ये मी ज्या ज्या रशियन खेळाडूविरुद्ध खेळेन, त्या प्रत्येकीला हरवणे हेच माझे ध्येय असेल, असा निर्धार तिने व्यक्त केला.