पडद्याआडून – मराठी रंगभूमीची नवी भरारी! आशय, मनोरंजन आणि नव्या पिढीचा दमदार संगम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>पराग खोत<<

मराठी रंगभूमीला सध्या चांगले दिवस आले आहेत’ हे विधान आज केवळ आशावादी नाही, तर वस्तुस्थिती आहे. गेल्या काही वर्षांत मराठी नाटकांनी पुन्हा एकदा रसिकांचा विश्वास जिंकला आहे. चित्रपट, ओटीटी आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावातही नाटय़गृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकू लागले आहेत. दर्जेदार संहिता, प्रयोगशील दिग्दर्शन, नव्या पिढीचे कलाकार आणि विषयांमधील वैविध्य यामुळे मराठी रंगभूमी नव्या आत्मविश्वासाने उभी राहताना दिसते. प्रेक्षकांची बदलती अभिरुची ओळखून मनोरंजनासोबत आशयालाही समान महत्त्व देण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सातत्याने करत आहेत. हीच आजच्या मराठी रंगभूमीची सर्वात मोठी ताकद आहे.

गेल्या काही वर्षांत विनोदी नाटकांची विशेष चलती दिसून येत आहे. ‘शिकायला गेलो एक’, ‘कुटुंब कीर्तन’ आणि ‘आमने-सामने’ या नाटकांनी कौटुंबिक विनोद, समकालीन वास्तव आणि हलक्याफुलक्या मनोरंजनाचा उत्तम मेळ साधत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्याचबरोबर ‘लग्न पंचमी’ आणि ‘ही दोस्ती तुटायची नाय’ ही नाटकंही हळूहळू आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. निखळ हास्याची परंपरा जपत ही नाटकं नातेसंबंधांवर भाष्य करतात हे त्यांचे वैशिष्टय़ ठरते.

मराठी रंगभूमीचे सध्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांचे पुन्हा नाटकाकडे होणारे पुनरागमन. स्वप्नील जोशी आणि सुमित राघवन यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर रंगभूमीकडे वळण्याचा निर्णय घेतला, तर अमृता खानविलकरने व्यावसायिक नाटकातून पदार्पण केले. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर ही मोठी नावं अनुक्रमे ‘भूमिका’ आणि ‘शंकर जयकिशन’ या नाटकांमधून प्रेक्षकांसमोर आली. या लोकप्रिय चेहऱ्यांमुळे नव्या प्रेक्षकवर्गाचे पाय नाटय़गृहाकडे वळताना दिसत आहेत. मात्र केवळ स्टारडमवर नाटक टिकत नाही. दमदार संहिता आणि सक्षम सादरीकरणच अंतिम यश मिळवून देते हेही गेल्या वर्षांत पुन्हा सिद्ध झाले आहे.

भद्रकाली प्रॉडक्शन्सने आपल्या वेगळ्या वाटचालीची परंपरा कायम ठेवली आहे. ‘संगीत देवबाभळी’च्या अभूतपूर्व यशानंतर ‘करुणाष्टके’सारख्या संगीतप्रधान आणि आशयघन नाटकाने त्यांनी दर्जाचा आग्रह सोडलेला नाही हे सिद्ध केले. त्याचबरोबर त्यांची साठावी निर्मिती असलेले ‘सांगा कसं जगायचं?’ हे गंभीर आशयाचे नाटकही रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळवत आहे. मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी नाटकंही प्रेक्षक स्वीकारत आहेत, हा मराठी रंगभूमीसाठी सकारात्मक संकेत आहे. त्याचाच परिपाक म्हणजे, ‘आता थांबवायचं कसं?’ हे एका गंभीर सद्यस्थितीवर भाष्य करणारे प्रभावी नाटक. डॉ गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी-मोने ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकानंतर तब्बल तीस वर्षांनी एकत्र आले आणि त्यांची तीच सहजता प्रेक्षकांनी अनुभवली.

याच प्रवाहात ‘भूमिका’ आणि ‘असेन मी नसेन मी’ यांसारखी नाटकं वेगळय़ा विषयांमुळे लक्ष वेधून घेत आहेत. एका बाजूला अंतर्मुख करणाऱ्या कथा, तर दुसऱ्या बाजूला नातेसंबंधांचा भावनिक वेध घेणाऱ्या संहितांमुळे मराठी रंगभूमीचा आशय अधिक समृद्ध होत आहे. आजचा प्रेक्षक केवळ करमणूक शोधत नाही, तर विचार करायला लावणारा अनुभवही अपेक्षित ठेवतो आणि निर्मातेही ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचवेळी जेन झी आणि तरुण पिढीसाठी आलेलं ‘ठरलंय फॉरएव्हरं’ हे टेक्नोसॅव्ही नाटक लक्ष वेधून घेणारं आहे. सोबत विनोद रत्ना यांचं ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ ही अनेक पुरस्कार मिळवलेली एकांकिका नाटकाच्या स्वरूपात आणि नव्या कलाकारांच्या संचात शतकमहोत्सवी ठरतेय.

दुसरीकडे सस्पेन्स, हॉरर आणि थ्रिलर या प्रकारांनाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘मास्टर माईंड’ आणि ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ यांसारख्या नाटकांनी सिद्ध केले की, मराठी प्रेक्षक नव्या प्रयोगांना मनापासून दाद देतात. त्याचवेळी ‘एकदा पहावं करून’सारख्या रत्नाकर मतकरी यांच्या नव्वदच्या दशकात गाजलेल्या नाटकांच्या पुनरुज्जीवनालाही रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जुन्या संहितांना आधुनिक सादरीकरणाची जोड देण्याचा हा ट्रेंड रंगभूमीसाठी आशादायी ठरत आहे. याच निमित्ताने नव्या पिढीतील प्रेक्षकांना तीन अंकी नाटकाची गोडी चाखता आली आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, नव्या पिढीतील निर्माते आता जोखीम पत्करायला तयार आहेत. विषयांची पुनरावृत्ती टाळून प्रत्येक निर्मितीत वेगळा अनुभव देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. डिजिटल माध्यमांच्या स्पर्धेतही जिवंत अभिनयाचा अनुभव, कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील थेट संवाद आणि नाटकाची सामूहिक ऊर्जा यांची जादू अजूनही तितकीच प्रभावी आहे. त्यामुळेच चांगल्या नाटकांच्या शोधात नाटय़गृहांकडे प्रेक्षकांची पावले वळत आहेत. मराठी रंगभूमी ही इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तिच्या इतर भावंडांपेक्षा अधिक सशक्त आणि प्रभावी आहे आणि हे त्या त्या भाषेतल्या दिग्गज नटांनी आणि दिग्दर्शकांनी जाहीरपणे मान्य केलं आहे. इथला विनोद अधिक दर्जेदार आहे, कथाकल्पना अधिक तर्काधिष्ठाrत आहेत आणि विषयवैविध्य अफाट आहे. इथला कॉमेडी मॅडनेस तर अफलातून आहे. अर्थात या सगळय़ाचे बरेचसे श्रेय मराठी नाटकांच्या प्रेक्षकांचे आहे.

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हा केवळ भूतकाळातील आठवण राहिलेला नाही. तो नव्या रूपात पुन्हा अनुभवायला मिळत आहे. आशय, मनोरंजन, तांत्रिक दर्जा आणि नव्या पिढीचा उत्साह यांचा सुंदर मिलाफ आजच्या रंगभूमीत दिसतो. ही वाटचाल अशीच सुरू राहिली, नवे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सातत्याने पुढे आले तर मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा अधिक वैभवशाली होईल यात शंका नाही. आजचा काळ मराठी नाटकाचा आहे आणि या रंगोत्सवाचा सर्वात मोठा मानकरी आहे तो जागरूक आणि नाटकावर मनापासून प्रेम करणारा रसिक मराठी प्रेक्षक. जोपर्यंत तो पाठीशी आहे तोवर मराठी रंगभूमी अशीच बहरत राहणार आहे.