आभाळमाया – चंद्र जन्मला तेव्हा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी आपली जीवनदात्री पृथ्वी अस्तित्वात आली आणि चंद्रसुद्धा त्यानंतर थोडय़ाच काळात अस्तित्वात आला. सूर्यमालेतल्या इतर सर्व ग्रहांपेक्षा आपल्या ग्रहाच्या या नैसर्गिक उपग्रहाचं महत्त्व अधिक. कारण, आपला ग्रह हा आतापर्यंत आपल्याला ठाऊक असलेल्या विश्वातील एकमेव सजीवसृष्टी धारण करणारा ग्रह आहे. याचा अर्थ आपल्याच आकाशगंगेतल्या सुमारे 200 अब्ज ताऱ्यांपैकी कुठेच जीवसृष्टी असणारी ग्रहमाला आणि त्यातील एखादा प्रगत ग्रह नसेलच असा अजिबात नाही. परंतु विज्ञानाला प्रमाण लागतं. केवळ अनुमान चालत नाही. त्यामुळे सध्या तरी अवघ्या विश्वात प्रचंड सजीवसृष्टी असलेली आपली निळी पाणीदार पृथ्वी एकटीच आहे. तिच्या अशा जैविक यशामध्ये आपल्या चंद्राचंही मोलाचं स्थान आहे. म्हणूनच चंद्राच्या अनेक गुणवैशिष्टय़ांची माहिती आपण अनेक वर्षे जुलै या ‘चांद्रमासा’त घेत असतो.

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या पंचांगातला (कॅलेंडर) चांद्रमास महत्त्वाचा असतोच; पण जुलै 1969 मध्ये माणूस चंद्रावर पोचला आणि तो आपल्यासाठी खरा चांद्रपरिचयाचा महिना ठरला. तर मुद्दा चंद्राच्या जन्माचा.

चंद्रजन्माच्या अनेक कथा आहेत. काही पौराणिक, तर काही वैज्ञानिक. आपल्याकडे चंद्राचा जन्म ‘क्षीरोदार्णव सम्भवम्’ म्हणजे क्षीरसागरातून झाला असं म्हटलं गेलं. पाश्चात्य जगातही अशीच चंद्राच्या ‘पृथ्वीज’ असल्याची संकल्पना होती. परंतु आधुनिक अभ्यासात ती मागे पडली आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्र ‘पकडला’ (कॅप्चर केला) अशी एक विचारधारा पुढे आली. मग तीही मागे पडून थिया नावाचा मंगळाच्या आकाराचा एक ग्रह आपल्या सौरमालेत जन्माला आला होता. ज्यावेळी इतर ग्रह अस्तित्वात आले तेव्हाच हा थियाही अस्तित्वात आला असणार. म्हणजे साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचाच काळ समजा.

या ‘थिया’ची आणि पृथ्वीची प्रचंड टक्कर झाली. त्यात त्या ‘थिया’चे आणि पृथ्वीचेही काही वस्तुमान बाहेर पडले. त्याच वस्तुमानाचा (द्रव्याचा) पुढे एक गठ्ठा होऊन चंद्र तयार झाला आणि पृथ्वीभोवती गरगरू लागला. पण त्याचे हे गरगरणे प्रचंड वेगवान आणि पृथ्वीच्या खूपच जवळच्या कक्षेमधून होत होते. सध्या चंद्र आपल्यापासून सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावरून फिरतोय. त्याच्या लंबवर्तुळाकार कक्षेत तो पेरिजी म्हणजे ‘उप’भू स्थानी असतो तेव्हा ते अंतर 3 लाख 50 हजार आणि ऍपोजी किंवा ‘अप’भू स्थानी असतो तेव्हा ते 4 लाख 6 हजार किलोमीटर एवढे (साधारणपणे) असते. प्रकाशवेगाच्या भाषेत सांगायचं तर, ते 1.3 प्रकाशसेकंद एवढंच आहे. त्यामुळे चंद्रावरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत यायला 1.3 सेकंदच लागतात. सूर्यप्रकाश यायला सवा आठ प्रकाश मिनिटं लागतात.

जन्म झाल्यावर पृथ्वीपासून फक्त 14000 ते 22000 किलोमीटर अंतरावरून हा चंद्र फिरत होता. इतक्या जवळून फिरत असेल तर पृथ्वीवर आदळत का नव्हता? याचं उत्तर असं की, त्यावेळी त्याचा वेगही प्रचंड असल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी समतोल साधून तो आपल्या कक्षेत (जवळच्या) फिरत राहिला. त्यावेळी त्याचा वेग प्रचंड होता. आता तो पृथ्वीभोवती 27 दिवसांत फिरतो. तेव्हा तो अवघ्या 4 ते 6 तासांत पृथ्वीप्रर्वा परिक्रमा करायचा. यावरून त्याच्या तत्कालीन वेगाची कल्पना करा.

चंद्र पृथ्वीच्या जवळून फिरत असताना चंद्र-पृथ्वी-सूर्य यांच्या प्रतलांचा विचार केला तर जवळपास दर महिन्याला सूर्यग्रहण लागत होतं. आता दिसतं तसं खग्रास सूर्यग्रहण मात्र त्यावेळी दिसत नव्हतं. तो 400 आकड्याचा जादुई खेळ कसा ते पुढच्या एप्रिलमधील (2027) शतकातल्या सर्वात जास्त काळाच्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी जाणून घेऊ.

एक गोष्ट नक्की, त्या काळात कंकणाकृती सूर्यग्रहणही दिसणं शक्य नव्हतं. चंद्र आता आहे तेवढय़ा अंतरावर जाऊन स्थिरावल्यानंतर सूर्याच्या खग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहणांचे आविष्कार दिसू लागले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चंद्र पृथ्वीचाच ‘तुकडा’ असता तर त्याचं स्वरूप (कॉम्पोझिशन) पृथ्वीसारखंच घडलं असतं.

ते तसं नाही. पृथ्वीच्या बाबतीत गाभ्यामध्ये 30 टक्के लोह आणि निकेल आहे. पृथ्वीचा गाभा, त्यावरील थर आणि चंद्राचा गाभा आणि पृष्ठभाग यात बराच फरक आहे. तो निव्वळ आकारमानाचा नसून चंद्रावर पोटॅशियम, सोडियम, जस्त (झिंक) याचं प्रमाण जास्त दिसतं. याशिवाय पृथ्वी जलनिधी आहे, तर चंद्रावर केवळ ध्रुवीय भागात पाणी बर्फाच्या स्वरूपात आढळतं.

चंद्राची घनतासुद्धा पृथ्वीपेक्षा बरीच कमी आहे. चांद्रपृष्ठावर कॅल्शियम, ऍल्युमिनियम असलेले खडक आहेत तसे मात्र पृथ्वीवर नाहीत. चंद्र-पृथ्वीत एक साम्य म्हणजे, निर्मितीनंतर पृथ्वीवरचा उफाळलेला लाव्हा थंड होत जसे खडक तयार झाले तसेच ते चंद्रावरही झाले आहेत. तिथे वातावरण खूपच विरळ आहे. कारण चंद्राचं गुरुत्वाकर्षण वातावरण जखडून ठेवण्याइतकं सक्षम नाही. ते पृथ्वीच्या एक-षष्ठांश असल्याने इथे एक फूट उंच उडी मारणारा तिथे आपोआप 6 फूट उंच उडेल हे लक्षात ठेवूनच, जड ‘सूट’ वापरून चांद्रवीरांना चांद्रपृष्ठावर सावकाश चालावं लागलं होतं.