सामना अग्रलेख – न्या. जामदार यांचे आभार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्या. माधव जामदार यांचे ठाम निवेदन अशा अंधारयुगात आले आहे की, देशातील जनतेने सर्व आशा-अपेक्षा गमावल्या आहेत व त्या अंधाऱ्या गुहेत स्वतःला विलीन करून घेतले आहे. राममंदिराच्या चोरीवर गप्प राहायचे. आमदार-खासदार पन्नास-पन्नास कोटींना उघड विकले जात आहेत. तरीही जनतेने या भ्रष्टाचाराविरोधात ‘मुर्दाबाद’ची घोषणा द्यायची नाही. जुलमी सरकारविरुद्ध मुठी आवळणे व घोषणा देणे हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा नागरी हक्क आहे. मात्र सध्याच्या सरकारने जनतेला गुलाम केल्यामुळे या हक्कांचा विसर पडला आहे. न्या. जामदार यांनी जनतेला ‘निर्भय बनो’चाच संदेश दिला आहे. न्या. जामदार यांनी धैर्य दाखवले. त्यांचे आभार मानावेच लागतील!

न्या. माधव जामदार यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. सध्या देश व जनता एका भयानक दिव्यातून जात आहे. सरकारविरुद्ध बोलणे, लिहिणे हा देशद्रोहासारखा गुन्हा ठरला आहे. असे करणाऱ्या काहींना तडीपार केले जात आहे. काहींना तुरुंगाच्या गजाआड बंद केले आहे. जे बाहेर आहेत त्यांना आपले विचार व्यक्त करण्याची मनाई केली आहे. ही एक प्रकारे आणीबाणी आहे. सरकारने लोकांना गुलाम बनवले आहे. या हुकूमशाहीचे कान उपटण्याचे काम मुंबई हायकोर्टाचे न्या. माधव जामदार यांनी केले. सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या साईद अहमद अब्दुल वाजीद चौधरी यांच्या विरोधात चेंबूरच्या पोलिसांनी भयंकर कारवाई करून त्यांना तडीपार केले. हे तडीपारीचे प्रकरण न्या. जामदार यांच्यासमोर आले तेव्हा त्यांनी ‘‘जनता सरकारची गुलाम आहे काय?’’ असा प्रश्न केला. लोकमान्यांनी ‘‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’’ हा प्रश्न विचारून ब्रिटिशांना घाम फोडला होता. त्यानंतर ‘‘जनता सरकारची गुलाम आहे काय?’’ या न्या. जामदार यांच्या प्रश्नाने खळबळ माजवली आहे. देशात सध्या लोकशाहीला तुडवले जात आहे. जनतेच्या मनातील साहस, धैर्य, अभिव्यक्ती म्हणजे अपराध आहे असे राज्यकर्त्यांनी ठरवून टाकले आहे. देशातील घटनात्मक तरतुदी संसदीय संकेत, सार्वजनिक यंत्रणा, सर्व काही पायदळी तुडविले आहे. न्या. जामदार यांनी सरकारच्या हुकूमशाही कार्यपद्धतीवर ताशेरे मारताना म्हटले आहे की, ‘‘भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद’’ अशा घोषणा देणं हे तडीपारीचं कारण होऊ शकत नाही. सरकारचा निषेध करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. सरकारच्या निर्णयाचा विरोध करणे हे एखाद्या नागरिकाला

तडीपार करण्याचे कारण

ठरू शकत नाही. आता अनेक परीक्षांचे पेपर लीक होत आहेत. मग नागरिकांनी त्याचा निषेध केला की, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करता. हा काय प्रकार आहे? न्या. जामदार यांनी महाराष्ट्रातील विकृत राजकारणाचे वाभाडे काढले. ते म्हणाले, “एका दहा वर्षांच्या शाळकरी मुलाचा अपघातात मृत्यू झाला आणि विधिमंडळात काय चर्चा सुरू आहे, तर उपसभापती कसे निवडले गेले? त्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कशी उडी मारली, त्यामुळे ते म्हणे पवित्र झाले.’’ इतके बोलून न्या. जामदार थांबले नाहीत. त्यांनी सध्याच्या ‘वॉशिंग मशीन’ संस्कृतीवर बोट ठेवले. त्यांनी याचिकाकर्त्यास सुचवले, ‘‘तुम्हीसुद्धा पक्षांतर करायला हवे. तुमच्यावरचे गुन्हे रद्द करायचे असतील तर तुम्हीही पक्षांतर करा. तिथे एक वॉशिंग मशीन आहे.’’ न्या. जामदार यांनी सरकारी हुकूमशाहीला हे खडे बोल सुनावले, पण उपयोग काय? उपड्या घड्यावर पाणीच! पाशवी बहुमताच्या नावाखाली आपल्याला मनमानी करण्याचा परवाना मिळाला आहे असे सरकारने मान्यच केले आहे. पुन्हा हे बहुमतही चोरलेले आहे. या चोऱ्यांवरही विरोधी पक्षाने बोलायचे नाही. देशात सर्वत्र असे भीतीचे आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपतराय, देशबंधू चित्तरंजन दास आदी नेत्यांनी आपल्याला काय शिकवले? अखेरीस आपण स्वातंत्र्य मिळवले ते कशासाठी, तर आपल्याला निर्भय होता यावे यासाठी. तोच स्वातंत्र्य मिळवण्याचा हेतू होता. मात्र हे स्वातंत्र्य मिळवल्यावर सत्तर वर्षांनंतरही आपण आपली मते प्रामाणिकपणे व्यक्त करायला घाबरत असू तर आपण

प्रगती करण्याऐवजी परागतीच

केली आहे, असे म्हणावे लागेल. एखाद्याला लाचारीतून गप्प बसावे असे वाटत असेल तर गोष्ट वेगळी, पण जर भीतीपोटी लोक गप्प बसत असतील किंवा त्यांना गप्प बसवले जात असेल तर ते योग्य नाही. लोक जर भीतीपोटी मोदी, शहा यांच्या सरकारची प्रशंसा करत असतील तर त्या प्रशंसेला अर्थ तरी काय? पण सध्या देशात हे असेच घडत आहे. जोर-जबरदस्तीचा मामला आहे. आज जनतेची स्थिती अशी आहे की, त्यांना न्याय मिळेल अशी यंत्रणा उरलेली नाही. सरकार त्यांचे नाही, पोलीस त्यांचे ऐकत नाहीत. संसद, विधिमंडळात त्यांचा आवाज उठवला जात नाही आणि न्यायालयेही पक्षीय विचारातूनच ‘न्यायबाजी’ करीत आहेत. अशा वेळी त्यांच्या नशिबी तडीपाऱ्या आणि ससेहोलपटच येत आहे. न्या. माधव जामदार यांचे ठाम निवेदन अशा अंधारयुगात आले आहे की, देशातील जनतेने सर्व आशा-अपेक्षा गमावल्या आहेत व त्या अंधाऱ्या गुहेत स्वतःला विलीन करून घेतले आहे. राममंदिराच्या चोरीवर गप्प राहायचे, सोनम वांगचुक जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पंधरा दिवस उपोषण करीत आहेत, मात्र कोणी ‘नीट’ पेपरफुटीवर बोलायचे नाही. आमदार-खासदार पन्नास-पन्नास कोटींना उघड विकले जात आहेत. तरीही जनतेने या भ्रष्टाचाराविरोधात ‘मुर्दाबाद’ची घोषणा द्यायची नाही. जुलमी सरकारविरुद्ध मुठी आवळणे व घोषणा देणे हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा नागरी हक्क आहे. मात्र सध्याच्या सरकारने जनतेला गुलाम केल्यामुळे या हक्कांचा विसर पडला आहे. न्या. जामदार यांनी जनतेला ‘निर्भय बनो’चाच संदेश दिला आहे. खरे म्हणजे न्यायमूर्तींच्या अंगी असेच साहस असायला हवे, पण अलीकडच्या काळात न्यायालयातील धैर्य हरवले आहे. न्या. जामदार यांनी धैर्य दाखवले. त्यांचे आभार मानावेच लागतील!