FIFA World Cup 2026 – अर्जेंटिनाला काबो व्हर्डेने रडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गतविजेत्या अर्जेंटिनाला फुटबॉलच्या नवख्या काबो व्हर्डेने अक्षरशः रडवले. काबो व्हर्डेकडून जर आत्मघातकी गोल झाला नसता तर अर्जेंटिना पराभवाच्या उंबरठय़ावर पोहोचू शकली असती. लिओनेल मेस्सीच्या गोलनंतरही आफ्रिकन संघाने दोनदा बरोबरी साधत अर्जेंटिनाला अतिरिक्त वेळ खेळण्यास भाग पाडले. अखेर अतिरिक्त वेळेत झालेल्या काबो व्हर्डेच्या आत्मघातकी गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने 3-2 असा थरारक विजय मिळवत उप उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, मात्र या विजयापेक्षा केप व्हर्डेच्या झुंजार लढतीचीच सर्वत्र चर्चा रंगली.

64 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मियामी स्टेडियमवर विश्वविजेत्या अर्जेंटिनाला विश्वचषकात पदार्पण करणाऱया संघाने अक्षरशः जेरीस आणले. जगातील 67 व्या क्रमांकाचा काबो व्हर्डेचा संघ शेवटच्या शिट्टीपर्यंत अर्जेंटिनाच्या छाताडावर बसून खेळला. सामन्याच्या 29 व्या मिनिटाला लिसांद्रो मार्टिनेझच्या अचूक लाँग पासवर लिओनेल मेस्सीने आपल्या डाव्या पायाच्या बाहेरील भागाने चेंडू नियंत्रित करत गोलरक्षक व्होझिन्हाला निष्प्रभ ठरवत चेंडू जाळ्यात धाडला. या स्पर्धेतील त्याचा सातवा आणि विश्वचषक कारकीर्दीतील विसावा गोल ठरला.

मात्र काबो व्हर्डेने हार मानली नाही. 58 व्या मिनिटाला कर्णधार रायन मेंडिसच्या पासवर डेरॉय डुआर्टेने शानदार फिनिश करत 1-1 अशी बरोबरी साधली. केप व्हर्डेचा जिद्दी खेळ इथेही थांबला नाही. 103 व्या मिनिटाला डाव्या बाजूचा बचावपटू सिडनी लोपेस पॅब्रालने अप्रतिम कार्ंलग शॉट मारत पुन्हा 2-2 अशी बरोबरी साधली आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांची धडधड वाढवली.

अखेरीस अतिरिक्त वेळेच्या दुसऱया सत्रातील सहाव्या मिनिटाला मेस्सीच्या कॉर्नरवर क्रिस्टियन रोमेरोने हेडर मारला. हा चेंडू काबो व्हर्डेचा बचावपटू डिनेय बोर्जेसच्या हाताला लागून गोलपोस्टमध्ये शिरला आणि आत्मघातकी गोलमुळे अर्जेंटिनाला 3-2 अशी निर्णायक आघाडी मिळाली.