पाकिस्तानात भीषण बस अपघात; खोल दरीत बस कोसळून 40 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमध्ये शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यानंतर बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांच्या सीमेलगत असलेल्या दान सर परिसरामध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली. यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अलीकडील काळातील पाकिस्तानमधील हा सर्वात भीषण बस अपघातांपैकी एक मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस महामार्गावरून घसरून दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. मूळ बसमधील प्रवाशांबरोबरच बिघाड झालेल्या दुसऱ्या बसमधील प्रवाशांनाही या बसमध्ये बसवण्यात आले होते. त्यामुळे बसमध्ये मोठी गर्दी झाली होती. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पाकिस्तानातील रस्ते सुरक्षेच्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.