
अमेरिकेतील मल्टिनॅशनल कंपनी ‘पेप्सिको’च्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांनी हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली आहे. अमेरिका सर्वोत्तम, चीन चांगला आणि हिंदुस्थान घाणेरडा देश असल्याचे वादग्रस्त वक्तव्य इंद्रा नूयी यांनी एका मुलाखतीत केले. मी हिंदुस्थानात राहिले असते तर कधीच सीईओ बनू शकले नसते, असे म्हणत त्यांनी देशातील कार्यसंस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेबाबतही धक्कादायक वक्तव्य केले.
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांनी इंद्रा नूयी यांची हूवर इंस्टिटय़ूशनच्या माध्यमातून मुलाखत घेतली. त्यावेळी नूयी यांनी स्वतःच्याच देशाबद्दल धक्कादायक विधाने केली. त्या म्हणाल्या की, हिंदुस्थानच्या तुलनेत चीनमध्ये खूप सुविधा आहे. तेथे कामाला महत्त्व दिले जाते. लोकही नीटनेटके असतात. मात्र, या सर्व बाबतीत अमेरिका खूप चांगली आहे.
चीन व्यवस्थित, हिंदुस्थानात अराजक
चीन व्यवस्थित आहे. मात्र भारतात पूर्णपणे अराजकता आहे. चीनमध्ये बहुतांशी एकसमान संस्कृती आणि लोक आहेत. पर्यटक म्हणून चीनमध्ये वेळ घालवणे सोपे आहे. मात्र, हिंदुस्थानात तसे नाही. हिंदुस्थानात रस्त्यांवर वाहनांसोबत गायी दिसणे सर्वसामान्य गोष्ट आहे. परदेशी पर्यटकांना मात्र अशा गोष्टींची सवय नसते, असे नूयी म्हणाल्या.
लोकशाही हीच हिंदुस्थानची सर्वात मोठी ताकद
चीन आज भलेही सुपरपॉवर बनला असेल, तेथे लोकशाहीची ताकद नाही. या बाबतीत हिंदुस्थान नेहमी पुढेच राहील आणि हीच देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असे इंद्रा नूयी म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, हिदुस्थानची प्रगती संथ आहे कारण तेथे सर्वांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. अमेरिकेप्रमाणे हिंदुस्थानातही लहानमोठी न्यायालये आहेत. त्यातून आपल्यालाही अधिकार आहेत याचा लोकांना विश्वास मिळतो. चीन याबाबतीत मागे आहे, असे नूयी म्हणाल्या.
हिंदुस्थानात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. चीनसोबत स्पर्धेमध्ये हिंदुस्थानची भूमिका महत्त्वाची आहे. हिंदुस्थानचे शेजारी किती खराब आहेत हे लक्षात घेऊन अमेरिकेने हिंदुस्थानचे संरक्षण करावे आणि तेथील लोकशाहीला विकसित होऊ द्यावे, अशी भूमिकादेखील इंद्रा नूयी यांनी मांडली.
हिंदुस्थानात प्रचंड अव्यवस्था आणि अनिश्चितता आहे. या अव्यवस्थेतच हिंदुस्थानचे खरे सौंदर्य आहे. याची सवय हिंदुस्थानी नागरिकांना झाली आहे. ही वेळही निघून जाईल, अशी मानसिकता झाली असून त्यांनी ही अव्यवस्था स्वीकारली आहे, असे नूयी म्हणाल्या.
इंद्रा नूयी यांनी अमेरिकेला जगातील सर्वोत्तम देश म्हणत स्तुतिसुमने उधळली आहेत. त्या म्हणाल्या की, अमेरिकेत योग्यतेवर आधारित काम होते. मी हिंदुस्थानातून येथे आले नसते, तर कधीच एवढय़ा मोठ्या कंपनीची सीईओ बनू शकले नसते, असे नूयी म्हणाल्या.

























































