
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग अटल बोगद्याजवळ गुरुवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना घेऊन जाणारे वाहन अपघातग्रस्त झाले. वाहन रस्त्यावरून घसरून उलटल्याने सहा जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील सोनमर्ग बोगद्याजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. जखमी जवानांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी सीआरपीएफ कॅम्पमध्ये हलविण्यात आले. सर्व जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, सीआरपीएफने 2026 च्या पहिल्या सहामाहीत एक महत्त्वपूर्ण विक्रम नोंदवला आहे. 1 जानेवारी ते 30 जून या कालावधीत देशभरातील विविध कारवायांदरम्यान सीआरपीएफच्या एकाही जवानाचा मृत्यू झालेला नाही. अनेक दशकांतील ही पहिलीच अशी कामगिरी असल्याचे सीआरपीएफचे महासंचालक जी. पी. सिंग यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे सांगितले. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
त्यांनी नमूद केले की, नक्षलविरोधी मोहिमांतील यश आणि प्रभावी नियोजनामुळे सीआरपीएफला सलग नवव्या महिन्यात कारवाईदरम्यान कोणतीही जीवितहानी सहन करावी लागलेली नाही. हा दलासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.




























































