न्यू यॉर्कच्या ‘एम्पायर स्टेट’ इमारतीवर चढून रशियन जोडप्याने केली एंगेजमेंट; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेमासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. सध्या न्यू यॉर्कमधील एक कपल सोशल मीडियावर चर्चेत आहे. न्यू यॉर्कमधीलप्रसिद्ध ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’च्या (Empire State Building) अगदी टोकावर चढून या रशियन जोडप्याने साखरपुडा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या थरारक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे.

नक्की काय घडलं?

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इव्हान बीरकूस (32) आणि अँजेला निकोलाऊ (33) असे या जोडप्याचे नाव आहे. हे दोघे मूळचे रशियाचे असून सध्या अमेरिकेत राहतात. या दोघे 1454 फूट उंच असलेल्या एम्पायर स्टेट इमारतीच्या छतावर पोहोचले. तिथे इव्हानने गुडघ्यावर बसून अँजेलाला अंगठी घालत लग्नाची मागणी घातली. यानंतर दोघांनी तिथेच एकमेकांना मिठी मारली आणि ते सुमारे 10 मिनिटे त्या उंचावर थांबले होते. या जोडप्याने केवळ साखरपुडाच केला नाही तर, इमारतीवरून एक मोठा बॅनरही फडकावला. त्यावर लिहिलं होतं, “जेव्हा प्रेमाची शक्ती ही सत्तेच्या हव्यासापेक्षा मोठी होईल, तेव्हा जगात शांतता पसरेल, असे त्यावर लिहिले होते.

काळे कपडे घालून हा स्टंट करणाऱ्या या जोडप्याला खाली उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले. बेकायदेशीरपणे इमारतीत घुसणे, स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे आणि सार्वजनिक शांततेचा भंग करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यू यॉर्कच्या पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अटकेचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

इव्हान आणि अँजेला यांना अशा प्रकारे उंच इमारतींवर चढून स्टंट (Extreme-climbing) करण्याची आवड आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या याच धाडसी प्रवासावर आणि प्रेमकथेवर आधारित ‘स्कायवॉकर्स: अ लव्ह स्टोरी’ (Skywalkers: A Love Story) नावाची डॉक्युमेंट्री 2024 मध्ये ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झाली आहे.