
चेंबूर ते जेकब सर्कल या दरम्यान धावणाऱ्या मोनोरेलला पावसाळ्याआधी सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने प्रयत्न सुरू केले होते. परंतु अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आले नसून सप्टेंबर 2025 पासून बंद असलेली मोनोरेल सुरू करण्यासाठी एमएमआरडीएला अद्याप मुहूर्त मिळू न शकल्याने प्रवाशांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल सुरू झाल्यापासून तोटय़ात आहे. तर अपघातांची, दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. ऑगस्ट 2025 मध्ये एकाच दिवशी दोन गाडय़ा अतिवजनामुळे कलंडल्या होत्या. त्यानंतर आणखी एक दुर्घटना घडल्याने एमएमआरडीएने मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली होती. मोनोरेलला 4 जूनला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले. सुरक्षा प्रमाणपत्र ही मोनोरेल व मेट्रोचे संचालन करण्यासाठीची अंतिम प्रक्रिया असते.



























































