कल्याणमध्ये शिवसेनेचा ‘शैक्षणिक यज्ञ’, 1600 विद्यार्थ्यांना मिळाले करिअर मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना करिअरविषयक योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात बुधवारी झालेल्या ‘शैक्षणिक यज्ञ’ मेळाव्यात तब्बल १ हजार ६०० विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी करिअरविषयक मोलाचे मार्गदर्शन केले.

शिवसेनेचे उपनेते विजय साळवी यांच्या पुढाकारातून शिक्षण, करिअर आणि स्पर्धा परीक्षांबाबत योग्य दिशा मिळावी या उद्देशाने करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भर पावसातही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण सभागृह विद्यार्थ्यांनी गजबजून गेले होते. या मार्गदर्शन शिबिरात विविध पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रम, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन तसेच इतर स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

जळगाव येथील प्रा. यजुर्वेद महाजन यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुती भोईर, लोककवी प्रा. प्रशांत मोरे आणि बिर्ला महाविद्याल याचे संचालक डॉ. नरेंद्र चंद्रा यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध शाळांतील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

भविष्यातील करिअरची दिशा आणि स्पर्धेच्य युगात योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी शिवसेनेच्या वतीने सुरू असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फल दायी ठरत आहे.

विजय साळवी शिवसेना उपनेते