मोटेगावकर कोठडीत, पण बॅनर मात्र शहरभर! महापालिकेच्या मिंधेपणावर नांदेडकर संतप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेपरफोड्या प्रा. शिवराज मोटेगावकर कोठडीत असला तरी महापालिकेच्या मिंधेपणामुळे आरसीसी क्लासेसचे बॅनर मात्र पुन्हा शहरभर झळकले आहेत. अनधिकृत बॅनरबाजीवर ‘सामना’ने आवाज उठवल्यानंतर महापालिकेने बॅनर हटवण्याचे नाटक केले होते. काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी मनपा अधिकाऱ्यांच्या देखरेखीत बॅनर लागल्याने या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नांदेडकरांनी केली आहे.

‘नीट’ परीक्षेचा पेपर फोडून २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या प्रा. शिवराज मोटेगावकर आणि नांदेड महानगरपालिकेचा ‘दोस्ताना’ सध्या चर्चेत आहे. पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे. मात्र त्याच्या आरसीसी क्लासेसचे बॅनर महापालिका अधिकाऱ्यांच्या कृपेने शहरभर झळकले आहेत. यापैकी किती बॅनर अधिकृत आहेत, किती बॅनरचे शुल्क भरलेले आहे हे गौडबंगालच आहे.

मनपाने तत्काळ कारवाई करावी – उपमहापौर दीपकसिंह रावत

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू असलेल्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीच्या क्लासेसची शहरात बॅनरद्वारे जाहिरात करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया मनपाचे उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी दिली.