
मुलांसाठी खाऊ आणायला गेलेल्या मातेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कल्याणच्या हनुमाननगर परिसरात घडली आहे. शशी चक्र (४२) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हनुमाननगर परिसरात शशी चक्र या पती राहुल चक्र आणि दोन मुलांसह राहात होत्या. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असताना शशी या आपल्या मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. यावेळी रस्त्यावर महावितरणची वीजवाहिनी उघड्यावर पडली होती. पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने शशी यांना विजेचा जोरदार झटका बसला. महिलेला शॉक लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांना घटनास्थळी जाऊन महिलेला तातडीने पाण्याच्या बाहेर काढले. मात्र विजेचा झटका इतका भयंकर होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
उपाययोजना करा
टिळकनगर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान पावसाळ्यात उघड्यावर पडलेल्या वीजवाहिन्या, तुटलेल्या केबल्स आणि विद्युत सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात. मात्र तरीही महावितरण याकडे कानाडोळा करत आहे. हनुमाननगरमधील ही घटना अत्यंत गंभीर असून महावितरणने अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली.





























































