FIFA World Cup 2026 – राखीव बाकावरचे ‘ब्रह्मास्त्र’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश वरवडेकर

फुटबॉलचे युद्ध आता पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगू लागलेय. प्रत्येक संघ आपले स्थान राखण्यासाठी सर्वस्वही पणाला लावू लागलेत. तसेही युद्धात प्रत्येक सेनापती पहिल्या फळीतील सैनिकांवरच लढाई जिंकत नाही. त्यांच्याकडे एक राखीव तुकडी असते. योग्य क्षणी ती मैदानात उतरते आणि सामन्याचा निकाल बदलते. आता सामना पहिल्या अकरा खेळाडूंनी सुरू होतो, पण शेवटच्या वीस मिनिटांत राखीव बाकावरून उठणारा एखादा खेळाडू संपूर्ण पटकथा बदलून टाकतो. जणू महाभारतात कृष्णाने शेवटच्या क्षणी सुदर्शनचक्र फिरवावं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य वेळी लपवलेला मावळा रणांगणात उतरवावा. तसाच आजच्या फुटबॉलमध्ये बाकावर बसलेला खेळाडू ब्रह्मास्त्र ठरतोय आणि सामना फिरवतोय.

राखीव बाकांवरचे या ब्रह्मास्त्र वर्ल्ड कप गाजवताहेत. गेल्या 83 सामन्यांत या ब्रह्मास्त्रांंनी तब्बल 43 गोल केलेत. म्हणजे जवळपास प्रत्येक पाचवा गोल हा बाकावरून आलेल्या खेळाडूच्या बुटातून निघालाय. सर्वात आधी सलाम करायला हवा जर्मनीच्या डेनिस उंडावला. हा गृहस्थ सुरुवातीला पहिल्या अकरात नव्हता. तो प्रशिक्षकाच्या भात्यातला अग्निबाण होता. सुरुवातीला त्याला जपून ठेवण्यात आलं. प्रतिस्पर्ध्याचे पाय जड झाले, बचावपटूंचा श्वास फुलला तेव्हा उंडावला मैदानात उतरवण्यात आलं. तो आला आणि त्याने तीन गोल, दोन असिस्ट केले. जणू बॉक्सिंगमध्ये बारा फेऱया खेळून दमलेल्या प्रतिस्पर्ध्याला अचानक माईक टायसनचा पंच बसावा.

सेनेगलच्या पापे गुएची गोष्ट तर आणखी भन्नाट. इराकविरुद्ध सामना रंगात आला होता. प्रशिक्षकाने त्याला मैदानात सोडलं आणि काही मिनिटांत दोन गोल. पापे गुए मैदानात आला तेव्हा इराकला वाटलं, आता सामना संपत आला. पण हा तर कमांडो निघाला. काही मिनिटांत दोन गोल. जणू शत्रूने किल्ला जिंकला असं समजत असतानाच गुप्त दरवाजातून मावळ्यांनी धडक द्यावी आणि संपूर्ण युद्धाचं चित्र बदलावं.

बेल्जियमचा रोमेलू लुकाकू हा तर अनुभवी ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणारा. तो आता 90 मिनिटांचा सैनिक राहिलेला नाही. तो प्रशिक्षकांचा सर्जिकल स्ट्राइक आहे. एक गोल, एक असिस्ट आणि बेल्जियमचा विजय. अनुभवी खेळाडू म्हणजे जुनी तलवार… म्यानात राहिली तरी तिची धार कमी होत नाही. हे लुकाकू सिद्ध करतोय.

यात जगज्जेत्या लिओनेल मेस्सीचंही नाव येतं. जॉर्डनविरुद्ध तो सुरुवातीला मैदानात नव्हता. प्रशिक्षकाने त्याला नंतर उतरवलं. मेस्सीने फ्री-किकवर गोल केला आणि सलग सात विश्वचषक सामन्यांत गोल करण्याचा विक्रम केला.

दुसरीकडे सेनेगलच्या प्रशिक्षकांनी तर राखीव बाकाला प्रयोगशाळाच बनवलं. त्यांचे चार गोल राखीव खेळाडूंनी केले. त्यांचं धोरण स्पष्ट होतं की, पहिले सत्तर मिनिटे प्रतिस्पर्ध्याला थकवा आणायचा आणि मग ताजे घोडे मैदानात सोडायचे. ही रणनीती म्हणजे बॉक्सिंगमधील शेवटच्या फेरीत मारलेला नॉकआऊट पंच. प्रतिस्पर्धी जमीनदोस्त.

फ्रान्सची गोष्ट तर अजून वेगळी. रँडल कोलो मुआनी, ब्रॅडली बारकोला आणि एदुआर्दो कामाविंगा हे खेळाडू बदली म्हणून मैदानात उतरतात, तेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या चेहऱयावरचा आत्मविश्वास कमी होतो. कारण हे खेळाडू येतात तेव्हा इतर बावीस जण दमलेले असतात आणि हे महाशय जणू सकाळच्या जॉगिंगला निघाल्यासारखे सुस्साट धावतात.

आजचा प्रशिक्षक फक्त अकरा खेळाडू निवडत नाही. तो नव्वद मिनिटांचं बुद्धिबळ खेळतो. कोणाला 60 व्या मिनिटाला उतरवायचं, कोणाला 75 व्या मिनिटाला, कोण दमला आहे, कोणाला पिवळं कार्ड आहे, कोणत्या बाजूचा बचाव कोसळतो आहे. हे सारं पाहून तो चाल खेळतो. ती चाल बरोबर पडली की राखीव बाकावर बसलेला खेळाडू ब्रह्मास्त्र ठरतो.

एकेकाळी फुटबॉलमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ हा बहुतेक वेळा सुरुवातीपासून खेळणाऱया खेळाडूला मिळायचा. आता परिस्थिती बदलली आहे. आता राखीव बाकावरून उठलेला खेळाडू दहा मिनिटांत सामना जिंकवतो आणि प्रेक्षक घरी जाताना त्याच्याच नावाचा जयघोष करत जातात. त्यातच यंदाच्या वर्ल्ड कपने एक गोष्ट कायमची सिद्ध केली आहे की, फुटबॉलमध्ये आता हीरो पहिल्या शिट्टीला जन्मत नाही. तो सत्तराव्या मिनिटाला राखीव बाकावरून उठतो आणि त्या क्षणी प्रशिक्षकाच्या हातातील बदलीचा फलक हा फक्त नंबर बदलत नाही, तो सामन्याचं नशीब बदलतो.