
‘बम बम भोले’च्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात अमरनाथ यात्रेची पहिली तुकडी शुक्रवारी पवित्र गुहेच्या दिशेने रवाना झाली. ४,८०० हून अधिक यात्रेकरूंचा समावेश असलेली पहिली तुकडी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काश्मीर खोऱ्यात दाखल झाली. विविध ठिकाणी फुलांचा वर्षाव, पुष्पहार आणि जल्लोषात यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. यापूर्वी गुरुवारी जम्मूतील भगवती नगर यात्री निवास येथून जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहिल्या जत्थ्याला हिरवा झेंडा दाखवून यात्रेला शुभारंभ केला.
काश्मीर खोऱ्यात प्रवेश करताच दक्षिण काश्मीरमधील काझीगुंड येथील नवयुग बोगद्यात यात्रेकरूंचे उत्साहात स्वागत करण्यात आले. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या. यानंतर यात्रेकरू दोन मार्गांनी पुढे रवाना झाले. एक गट बालटालमार्गे, तर दुसरा पहलगाममार्गे पवित्र गुहेकडे निघाला. पहलगाम मार्गावरील नुनवान बेस कॅम्पमध्येही प्रशासनाच्या वतीने यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. असे वृत्त आज तक ने दिले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही काळासाठी पहलगाम मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र, परिस्थिती सुधारल्यानंतर प्रशासनाने हा मार्ग पुन्हा खुला केला असून यात्रा सुरळीत सुरू आहे. यंदाची अमरनाथ यात्रा ३ जुलै ते २८ ऑगस्ट या कालावधीत, एकूण ५७ दिवस चालणार आहे. यात्रेसाठी भाविकांना पारंपरिक पहलगाम मार्गासह गांदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून जाणारा सुमारे १४ किलोमीटरचा लहान मार्गही उपलब्ध आहे. प्रशासनाने यात्रेकरूंना सर्व सुरक्षा आणि प्रवासासंबंधीच्या नियमांचे पालन करण्याचे तसेच अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.





























































