
महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा देण्याचे विधेयक मंजूर करून आज आपण महिलांना ताकद दिलेली आहे. पण आज राज्यातील शेतकरी खूष नाही. शेतकरी आत्महत्या तेवढ्याच आहेत. शेतकऱ्यांचे हाल कमी करण्यासाठी कोणत्याही अटीशर्तीशिवाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले. त्यापूर्वी या विधेयकाला पाठिंबा देताना आदित्य ठाकरे यांनी सरकारला अजून एका कर्तव्याची जाणीव करून दिली. ते म्हणाले की, हे विधेयक मंजूर करीत असताना एम.एस. स्वामीनाथन यांची आठवण येते. त्यांनी आपल्या देशातील कृषी क्षेत्रात क्रांती आणली. पण जेव्हा आपण बांधावर जातो तेव्हा पुरुष शेतकरी शेतात भेटतात; मात्र महिला एका बांधावर बाजूला शेतमजूर म्हणून बसत होत्या. पण आता त्यांची ओळख शेतकरी म्हणून होणार आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. हे पाऊल पुढे टाकत आहोत. हे केवळ कागदोपत्री राहू नये. त्याची प्रत्येक जिल्ह्यात अंमलबजावणी आतापासून होणे गरजेचे आहे.
सध्या आपण शेतकऱ्यांचे हाल पाहत आहोत ते खरोखरच बघण्यासारखे नाहीत. पाऊस लांबला होता. दुष्काळासारखी परिस्थिती होती; पण आता पाऊस सुरू झालेला आहे. हे पुढचे वर्ष कसे असेल ते आपल्याला माहीत नाही. मागील दहा वर्षांत वातावरणीय बदलामुळे कधी पाऊस, कधी गारपीट होते. मग आपण सर्व विरोधी आणि सत्ताधारी पक्ष कधी एकत्र येतो, कधी भांडतो, कधी शेतकऱ्याच्या बांधावर जातो. पण आता शेतकरी महिलांना मुख्य प्रवाहात आणताना त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक केंद्र उभे करावे लागेल, अशी सूचना त्यांनी केली.
महिलांच्या आरोग्याचाही विचार गरजेचा आतापर्यंत आपण महिलांचे हाल बघत आलो आहोत. महिला फक्त राबायला आहेत. मजुरी करायला आहेत या मानसिकतेतून आपल्याला बाहेर यायला लागेल. पुढे येऊन त्यांना सन्मान द्यायचा असेल तर सामाजिक, आर्थिक सन्मान व आरोग्य देखभालीवर विचार करणे गरजेचे आहे. आरोग्य म्हटल्यावर त्यांना सॅनिटरी पॅड पुरवण्यापासूनचे प्रश्न आहेत. सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन शेतावर उपलब्ध करून देता येतील का याचा आपण हा विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
































































