
अहिल्यानगर जिल्ह्यातील जागतिक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी भाविक वेगवेगळ्या स्वरूपात दान अर्पण करत असतात. देश-विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा समाधी मंदिरात नुकतीच भक्तीने ओतप्रोत भरलेली एक अनोखी भेट पाहायला मिळाली. तामिळनाडू येथील एका महिला भाविकाने बाबांच्या चरणी तब्बल 13 लाख 27 हजार 900 रुपये किमतीचा अत्यंत आकर्षक आणि मौल्यवान सुवर्ण शंख अर्पण केला आहे.
चेन्नई येथील रहिवासी असलेल्या साईभक्त जी. लक्ष्मी कांता यांनी ही मौल्यवान भेट साईचरणी अर्पण केली आहे. या शंखावर अत्यंत बारीक आणि सुंदर नक्षीकाम करण्यात आले असून, त्यासाठी तब्बल 100 ग्रॅम सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. हा कलाकुसर केलेला सुवर्ण शंख पाहताना मंदिरात उपस्थित असलेल्या इतर भाविकांचे डोळे दिपून गेले होते.
तामिळनाडू येथील एका महिला भाविकाने साईबाबांच्या चरणी तब्बल 13 लाख 27 हजार 900 रुपये किमतीचा अत्यंत आकर्षक आणि मौल्यवान सुवर्ण शंख अर्पण केला pic.twitter.com/lsAQS7w44U
— Saamana Online (@SaamanaOnline) July 3, 2026
हा अमूल्य शंख संस्थानकडे सुपूर्द करताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी. गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी संस्थानच्या वतीने दानशूर महिला भाविक जी. लक्ष्मी कांता यांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन रीतसर सत्कार केला व त्यांचे आभार मानले.
साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा आहे. बाबांच्या चरणी कोणी सोन्या-चांदीचे दागिने, गुप्त दान तर कोणी रोख रक्कम अर्पण करत असते. मात्र, चेन्नईच्या महिला भक्ताने अर्पण केलेल्या या अनोख्या सुवर्ण शंखाची सध्या शिर्डीत आणि साईभक्तांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.






























































