ठसा – सुभाष दीक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिया खंडातील पहिली रेल्वे ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या मार्गावर धावली होती. 2002 साली या ऐतिहासिक प्रवासाला 150 वर्षे पूर्ण झाली होती. हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा नव्या पिढीला समजावा या उद्देशाने मध्य रेल्वेने त्या प्रवासाची आठवण करून देणारी एक रेल्वे याच मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला होता. त्या प्रवासासाठी लागणारे वाफेचे इंजिन पुनरुज्जीवित करण्याची जबाबदारी पार पाडलेले सुभाष चिंतामण दीक्षित यांचे नुकतेच निधन झाले.

रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देशाला व्हावी या उद्देशाने ही रेल्वे तयार करण्यात आली होती. त्यासाठी लागणारे मागच्या शतकातील जुने डबे हे दिल्लीतील रेल्वे संग्रहालयातून मुंबईत आणण्यात आले होते. त्यासाठी लागणारे वाफेचे इंजिन मात्र तयार नव्हते. 1990 च्या आसपास मध्य रेल्वेने वाफेची इंजिनं सेवेतून बाद केली. त्यानंतर 1995 साली रुळांवरून वाफेची इंजिने कायमची बंद करण्यात आली होती. ब्रॉड गेज रुळांवर चालणारी वाफेची इंजिने सेवेतून काढून टाकणारी मध्य रेल्वे हा पहिला रेल्वे विभाग होता. त्यामुळे पहिल्या रेल्वे प्रवासाची आठवण करून देणारी रेल्वे चालवण्यासाठी वाफेची इंजिने तयार नव्हती. परळच्या मध्यवर्ती रेल्वे कार्यशाळेत दोन इंजिने 1990 पासून धूळ खात पडून होती. तब्बल 12 वर्षे ती पडून राहिल्याने त्यांचे सुटे भागही उपलब्ध नव्हते आणि संपूर्ण इंजिन गंजले होते. ही इंजिने तयार करण्याची जबाबदारी मध्य रेल्वेने सुभाष दीक्षित यांच्यावर सोपवली. दीक्षित त्यावेळी परळच्या कार्यशाळेचे सहाय्यक कार्यशाळा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. आपला दांडगा अनुभव, अभियांत्रिक कौशल्य आणि विशेष म्हणजे रेल्वेवरील प्रेमामुळे त्यांनी ही कठीण जबाबदारी स्वीकारली आणि वाफेच्या दोन्ही इंजिनांना पुनरुज्जीवित केले. इतकेच नव्हे तर त्यांना रुळांवरून पुन्हा विनाअडथळा धावण्यायोग्य बनवले. त्यांच्यामुळेच 16 एप्रिल 2002 रोजी मध्य रेल्वेची ‘हेरिटेज’ रेल्वे धावली. हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी रेल्वे फलाट, इमारतींच्या छतावर, रेल्वे रुळांच्या शेजारी गर्दी केली होती. हजारो रेल्वेप्रेमींनी ही हेरिटेज रेल्वे पाहिली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. याचे सर्व श्रेय हे सुभाष दीक्षित आणि त्यांच्या साथीदारांना जाते. सुभाष दीक्षित यांच्या निधनामुळे मध्य रेल्वेने एक कुशल, मितभाषी अभियंता तसेच वाफेवरच्या इंजिनाचा एक शिलेदार गमावला.