
पाकिस्तानमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) एक खळबळजनक दावा केला आहे. गेल्या 9 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तानभर तब्बल 34 वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत. या अवघ्या 11 दिवसांच्या कालावधीत पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या 23 सैन्याला कंठस्नान घालण्यात आल्याचा दावा बीएलएने केला आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे 14 सैनीक, कथित ‘डेथ स्क्वॉड’चे नऊ सदस्य आणि लष्करी गुप्तचर विभागाच्या सैन्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीएलएच्या दाव्यानुसार, या कारवायांदरम्यान त्यांच्या बीएलएने पाकिस्तानी लष्कराच्या एका कार्यरत जवानालाही जिवंत पकडले आहे. तसेच, धोरणात्मक भाग म्हणून प्रमुख महामार्गांवर नियंत्रण प्रस्थापित करत आर्थिक नाकेबंदीच्या धोरणांतर्गत अचानक तपासणी सत्र राबवण्यात आले. मात्र, या सर्व संघर्षादरम्यान पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या थेट चकमकीत बीएलएचे 6 सदस्यही मारले गेल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. बीएलएने या संपूर्ण हल्ल्यांचा सविस्तर घटनाक्रम जाहीर केला आहे. घटनाक्रमानुसार, 9 ऑक्टोबर रोजी बीएलएने तुरबतच्या नसीराबाद भागात पाकिस्तानी सैन्य आणि कथित डेथ स्क्वॉडच्या सदस्यांना लक्ष्य करत हल्ला केला, ज्यामध्ये डेथ स्क्वॉडचा एक सदस्य जागीच ठार झाला. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी हरनाईच्या शहरग भागातील साजो जवळ पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला. या भीषण स्फोटात लष्करी वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, तीन जवान जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. याच दिवशी चगाई जिल्ह्यातील दलबंदिन येथील क्वेटा-ताफ्तान व्यापारी मार्गावर दोन व्यापारी वाहने बळकावून त्यातील एक वाहन जाळून खाक करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला.
सलगच्या हल्ल्यांच्या मालिकेत 14 ऑक्टोबर रोजी मस्तुंगच्या दश्त बाबा भागात पाकिस्तानी सैन्यावर अचानक हल्ला चढवण्यात आला, ज्यामध्ये दोन सैनिक मारले गेले आणि दोन वाहनांचे नुकसान झाले. याच दिवशी खुजदारमधील सिम्बा पुलाजवळ लष्करी ताफा आणि व्यापारी वाहनांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला. यादरम्यान, खोकप, खारान येथील रहिवासी असलेले बहादूर खान आणि साबिर यांना मृत्युदंड देण्याची मागणी संघटनेने केली. हे दोघे कथितपणे डेथ स्क्वॉडशी संबंधित असून पाकिस्तानी सैन्याला गुप्त माहिती पुरवून मदत करत असल्याचा आरोप बीएलएने केला आहे.तर, 15 ऑक्टोबर रोजी बुलेदा येथील जमदानमध्ये लष्करी ताफ्यांना सुरक्षा पुरवणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला करण्यात आला, ज्यात एक सैनिक ठार आणि दुसरा जखमी झाला. त्याच दिवशी नोश्की बाजारमध्ये दुकानदाराच्या वेशात पाकिस्तानी सैन्यासाठी हेरगिरी करणाऱ्या पुन्हल नावाच्या व्यक्तीला कंठस्नान घालण्यात आल्याचा दावा करण्यात आला. याशिवाय, किला अब्दुल्ला येथील पिंकी पोस्ट स्फोटकांच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचेही संघटनेने म्हटले आहे. बीएलएच्या या सविस्तर दाव्यांमुळे पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






























































