
घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात सुरु झालेली आहे, या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे खंडेमहानवमी विजयादशमी दसरा दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस श्री.विजयालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हिऱ्याचे कंगनजोड, नामनिळाचा, नवरत्नाचा हार, मोरमंडळी, मोत्याचा तुरा, चांदीची काठी, सोन्याचे घोंगडे, सोन्याचे पितांबर, मोत्याची कंठी, हिऱ्याचे पैंजण तोडे, जवेची माळ, तुळशीची माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, मोठी बोरमाळ इ. अलंकार परिधान करण्यात आलेली आहेत.
रुक्मिणी मातेस जडावाचे मुकुट, जडावाचे बाजूबंद, खड्यांची वेणी, चिंचपेटी हिरवी, हातसर जोड, पाण्याडयाचा हार, तनमणी मोठा, कोल्हापुरी साज, दशावतारी साज, सोन्याची साडी, ठुशी, मास पट्टा, शिंदे हार, जडावाचे ताणवड, चंद्र, सूर्य, बाजीराव गरसोळी, पेठयांची बिंदी, खड्यांच्या पाटल्या, मोत्याचे बाजूबंद, मत्स्य, रूळ जोड, पैंजण जोड, मोठी नथ, कर्णफुले, सोन्याचा करंडा, छत्रछामर, तोडे जोड, तारा मंडळ, चंद्रहार इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
राधिका मातेस नक्षी टोप, जवेची माळ, पुतळ्यांची माळ, जवमनी पदक, हायकोल इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. सत्यभामादेवीला सिद्धेश्वर टोप, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, जवेची माळ, पुतळ्यांची माळ, चिंचपेटी तांबडी, लक्ष्मीहार इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
महालक्ष्मी मातेला सोन्याचे गंठण, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी एक पदरी पाचूचा लोलक असलेली, एकदाणी, चंद्रहार पाच पदरी, चांदी छत्री, साखळ्या जोड, तुळशीची माळ इत्याधी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
श्री. व्यंकटेशास लॉकेट, मोत्याची कंठी, इमिटेशन नेकलेस, जवेची माळ, चंद्रहार, मोत्याचा तुरा, साखळ्या जोड, सोन्याचे पितांबर, शिरपेच इत्यादी अलंकार प्रथा परंपरेप्रमाणे परिधान करण्यात आलेले आहेत. तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आलेले आहेत.
२२ ऑक्टोबर रोजी एकादशी असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन दर्शनरांगेतील गर्दीचे नियोजन, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, पिण्याच्या पाण्याची व चहावाटपाची व्यवस्था, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग, विद्युत व्यवस्था आणि इतर अनुषंगिक सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.





























































