चेन्नई-गोवा इंडिगो फ्लाइटला बॉम्बची धमकी; कसून तपासणीनंतर अखेर पाच तासांच्या विलंबाने विमान गोव्यासाठी रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नईहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E588 क्रमांकाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी तत्परता दाखवत विमान तातडीने एका विलगीकरण कक्षात हलवले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवून कसून तपासणी सुरू केली.

चेन्नईहून हे विमान सोमवारी सायंकाळी 5.40 वाजता गोव्यासाठी उड्डाण करणार होते. मात्र, सायंकाळी 6.05 वाजता बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीने (बीएटी) ही धमकी ‘विशिष्ट’ अर्थात अत्यंत गंभीर आणि ठोस असल्याचे घोषित केले. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाला तातडीने विलगीकरण कक्षात नेण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी अवघ्या काही वेळातच, सायंकाळी 6:55 पर्यंत विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले.

यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नियमानुसार कसून घातपात प्रतिबंधक तपासणीसह संपूर्ण विमानाची बारीक पाहणी केली. ही सखोल तपासणी पूर्ण झाल्यानंतर रात्री 9:20 वाजता बॉम्ब धमकीची कारवाई औपचारिकपणे थांबवण्यात आली आणि विमान पुन्हा इंडिगो एअरलाइन्सच्या स्वाधीन करण्यात आले. सर्व सुरक्षा निकष पूर्ण झाल्यानंतर सुमारे पाच तासांच्या विलंबाने हे विमान रात्री 10:30 वाजता गोव्याच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, चेन्नई विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकारामागील धमकीचा नेमका स्रोत अद्याप समजू शकलेला नाही आणि त्याचा शोध घेतला जात आहे.