शफालीच्या प्रहाराने झिम्बाब्वेची दारुण हार; 53 चेंडूंतच विजय; मालिका हिंदुस्थानच्या खिशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या महिला संघाने झिम्बाब्वेच्या आव्हानाचा अक्षरशः चुराडा करत तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेवर 2-0 असे शिक्कामोर्तब करत मालिकाही आपल्या खिशात घातली. दुसऱया टी-20 सामन्यात हिंदुस्थानने झिम्बाब्वेचे 103 धावांचे आव्हान अवघ्या 8.5 षटकांतच गाठत दुसरा सामनाही जिंकली.

झिम्बाब्वेचे 103 धावांचे आव्हान अत्यंत तुटपुंजे भासले. शफाली वर्मा आणि कर्णधार स्मृती मानधना यांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर असा हल्ला चढवला की, त्यांनी झिम्बाब्वेला मानच वर काढू दिली नाही. शफालीने अवघ्या 24 चेंडूंत अर्धशतक झळकावत प्रतिस्पर्ध्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. तिच्या 25 चेंडूंतील 55 धावांच्या खेळीत चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. स्मृतीनेही 25 चेंडूंत नाबाद 47 धावा करत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी रचली.

हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजीला सुरुवातीपासूनच खिंडार पाडले. त्यामुळे त्यांच्या धावांना फारशी गती मिळाली नाही. त्यातच पदार्पणवीर निकी प्रसादने आपल्या पहिल्याच चेंडूवर चिपो मुगेरीची आणि दुसऱया चेंडूवर न्याशा ग्वानझराची विकेट काढत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा पराक्रम केला.