मदर ऑफ ऑल बॉम्ब्सचा सामना करण्यासाठी इराण सज्ज, इराणी संरक्षणमंत्र्यांचा अमेरिकेला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे नवनियुक्त संरक्षणमंत्री मेहरदाद अखलाघी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर आणखी हल्ले न करण्याबाबत कडक इशारा दिला आहे. इराणने मदर ऑफ ऑल बॉम्ब्सला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या असून तेहरानला आपल्या लष्करी तयारीवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार अखलाघी म्हणाले, “आम्ही मदर ऑफ ऑल बॉम्ब्सचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत आणि आमच्या तयारीबाबत आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत.” ट्रम्प यांना वाढत्या तणावाबद्दल इशारा देताना ते पुढे म्हणाले, “ट्रम्प यांनी आपल्या सैन्याला या प्रदेशातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर त्यांनी बॉम्ब टाकला, तर त्यांच्या किती सैनिकांना बॉडी बॅगमध्ये परतावे लागेल, याचा विचार त्यांनी करावा. त्यांनी आपल्या धमक्या प्रत्यक्षात आणल्यास, त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील.”

इराणच्या संसदेने रविवारी अखलाघी यांच्या संरक्षण आणि सशस्त्र दल रसद मंत्रीपदाच्या नियुक्तीला मंजुरी दिल्यानंतर त्यांचे हे आक्रमक विधान समोर आले या आहे. एकूण २७७ पैकी २३७ खासदारांनी त्यांच्या नियुक्तीच्या बाजूने तर १५ जणांनी विरोधात मतदान केले. ५ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या पदासाठी अखलाघी यांच्या नावाची शिफारस केली होती.