
शांतीनगर परिसरातील एका गोदामावर एडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून 33 लाख रुपये किमतीचे मुदतबाह्य खाद्यपदार्थ जप्त केले. मुदत संपल्यानंतर या खाद्यापदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावणे आवश्यक होते. मात्र ते पुन्हा विक्रीसाठी या गोदामात साठवण्यात आले होते. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.
गोदामामध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा आढळून आल्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. चे पूर्णवेळ संचालक व्ही. सुब्रह्मण्यम व अशोक कुमार सिंग, विजय खरमाळे, नीलेश देशमुख, अरविंदर सिंग धिंसा, दीपक सिंग, आबिद शेख बाबर, मियादा अहमद सिद्दिकी, गुलजार अब्दुल खान, अब्दुल मोबिन खान, ग्रीन अर्थ वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस व मे. एस. के. ट्रेडर्सचे व्यवस्थापक यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर शांतीनगर पोलिसांनी या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी आपसात संगनमत करून 33 लाख 71 हजार 500 रुपये किमतीच्या खाद्यपदार्थाचा माल 16 डिसेंबर 2024 व 3 नोव्हेंबर 2025 च्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून विक्री केल्याचे उघड झाले आहे.
मुदत संपलेला हा माल या गोदामात साठवून ठेवला असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मोरे हे पुढील तपास करीत आहेत.



























































