
>> सुनील उंबरे
चंद्रभागा नदीचे सौंदर्य आणि भाविकांच्या सोयीसाठी 51 कोटी रुपये खर्च करून घाट उभारण्यात आला. पहिल्याच पावसात हा घाट कोसळल्याने, या अपघातात सहा भाविकांना आपला जीव गमवावा लागला. 14 ऑक्टोबर 2020 रोजी ही दुर्दैवी दुर्घटना घडली. या घटनेला शुक्रवारी (दि. 16) सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, अद्याप या दुर्घटनेचे कारण समोर आले नाही. या अपघाताला जबाबदार संबंधित ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांवर कसलीही कारवाई झाली नाही. विकासाच्या नावाखाली झालेल्या या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून अपघाताला जबाबदार असणाऱयांवर कडक कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, अधिकारी, ठेकेदार आणि नेते यांच्या अभद्र युतीमुळे मृतांना न्याय मिळणे कठीण झाले आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास या नावाखाली पंढरपूर शहरात कोटय़वधी रुपयांची निकृष्ट अन् निरुपयोगी कामे मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. चंद्रभागा नदीवरील कुंभार घाटाचे काम त्यापैकीच एक. सुमारे 51 कोटी रुपयांचे हे घाट बांधणीचे काम होते. काम सुरू असतानाच, या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करून पाटबंधारे विभागाने हे काम तसेच पुढे रेटले. काम झाल्यानंतर काही महिन्यांत शहरात मोठा पाऊस झाल्याचे निमित्त झाले आणि हा घाट आणि या घाटाची संरक्षक भिंत कोसळून या भिंतीच्या आडोशाला उभे राहिलेले सहाजण दगड-मातीच्या ढिगाऱयाखाली गुदरमरून जागीच मरण पावले.
ही दुर्घटना घडल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आणि दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले होते. या विषयाच्या अनुषंगाने पंढरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला. पण सहा वर्षे झाली पोलिसांना दोषी व्यक्ती सापडलेली नाही. वास्तविक हे काम पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून करण्यात येत होते. या घाटाचे डिझाईन त्या कामाचा दर्जा पाहण्याची जबाबदारी या विभागाची होती. मात्र, अधिकाऱयांनी कामाकडे गांभीर्याने पाहिले नाही. नागरिकांनी आणि पत्रकारांनी तक्रारी करूनही दुर्लक्ष केले गेले. त्याच्या परिणामी सहाजणांना जीव गमवावा लागला. या प्रकरणात पोलिसांच्या तपासावरही मृतांच्या नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केला.
कॉरिडॉरच्या कामांबाबत साशंकता
– पंढरपूरमध्ये नुकताच कॉरिडॉर मंजूर झाला आहे. यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी येणार आहे. या निधीतून शहराच्या विकासाची कामे करण्याचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी पंढरपूर शहरात झालेली विकासकामे पाहता या कॉरिडॉरच्या माध्यमातून होणाऱया कामाबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. कॉरिडॉरच्या कामांचे टेंडर राजकीय हस्तक्षेप आणि पारदर्शकता न ठेवता काढले गेले, तर घाट दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती पंढरपूरकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



























































