
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी अभिनेता इम्रान खान याला देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने बजावलेल्या नोटिसीला इम्रान खान याने आज हायकोर्टात आव्हान दिले असून, सोमवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी तसेच एसआयआर प्रक्रियेतील गोंधळाप्रकरणी मुंबईत 10 ऑक्टोबर रोजी निदर्शने करण्यात आली होती. या निदर्शनात अभिनेता इम्रान खान याने उत्स्फूर्तपणे सहभागी होत तीव्र निदर्शने केली होती. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी इम्रान खान याला ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर, त्याला देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसला अभिनेता इम्रान खान याने हायकोर्टात आज शनिवारी ऍड. झुल्फिकार मेमन यांच्यामार्फत आव्हान दिले. 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याची नोटीस बेकायदेशीर, चुकीची व अन्यायकारक असून त्याने ही नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर सुनावणीची शक्यता आहे.

























































