शीव उड्डाणपूल दसऱ्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला करा, अन्यथा… शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर आणि पूर्व उपनगराला जोडणाऱया शीव उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी केवळ मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडले आहे. परिणामी सर्वसामान्यांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. दसऱ्यापूर्वी शीव उड्डाणपुलाचे उद्घाटन करा, अन्यथा बुधवारी आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शीव रेल्वे उड्डाणपूल हा मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना तसेच धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. तब्बल 112 वर्षे जुना हा ब्रिटिशकालीन धोकादायक पूल पुनर्बांधणीसाठी 1 ऑगस्ट 2024 पासून वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.  हा धोकादायक पूल पाडून 54.5 मीटरचा एकच लांब स्पॅन आणि 29 मीटर रुंदीचा नवा पूल उभारण्यात आला आहे.

धारावीकरांच्या संयमाचा अंत बघू नका

गेल्या अडीच वर्षांपासून शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असल्याने धारावीकरांची खासकरून शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, व्यापाऱयांची मोठी गैरसोय होत आहे. आधीच या पुलाचे काम वर्षभर उशिराने पूर्ण झाले. आता पूल तयार झाला तरी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे उद्घाटन रखडले आहे. सर्वसामान्य धारावीकरांना वेठीस धरून त्यांच्या संयमाचा अंत बघू नका. दसऱयापूर्वी या पुलाचे उद्घाटन करा अन्यथा बुधवारी हजारो धारावीकर रस्त्यावर उतरून हा पुल वाहतूकीसाठी खुला करतील, असा इशारा माजी आमदार बाबूराव माने यांनी दिला.