अभिषेक कळमकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला! न्यायालयाचा पुन्हा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी महापौर अभिषेक कळमकर यांना अटकपूर्व जामीन अर्ज प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा झटका देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात एक आणि जिल्हा व सत्र न्यायालयात तीन असा एकूण चारवेळा कळमकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

अहिल्यानगर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात 21 फेब्रुवारी 2026 रोजी अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान मूळ फिर्यादीच्या वतीने गुह्याचे गांभीर्य, प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि तपासासाठी आरोपीची कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता या मुद्दय़ांवर लेखी युक्तिवाद मांडण्यात आला. पुराव्यांच्या अनुषंगाने तपासात आवश्यक असलेल्या बाबींचा विचार करून आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, अशी भूमिका मांडली.

या प्रकरणात अभिषेक कळमकर यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात एक आणि जिल्हा व सत्र न्यायालयात तीनवेळा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. हे चारही अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दाखल करण्यात आलेल्या अर्जावरही 17 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने नकारात्मक निर्णय देत कळमकर यांना झटका दिला.

मूळ फिर्यादीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील फौजदारी वकील ऍड. उमेश यादव-पाटील यांनी काम पाहिले. त्यांना अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातील वकील भाऊसाहेब पालवे, नेमाने, इंगळे, थोरात, बऱहाडे, परदेशी आणि दारुणकर यांनी सहकार्य केले.