
मुंबईतील भवानी माता क्रीडांगणावर सुरू असलेल्या ५८ व्या शिवनेरी कबड्डी महोत्सवात व्यावसायिक व कुमार गटात चुरशीचे सामने पाहायला मिळाले. या महोत्सवात सेंट्रल रेल्वे आणि मुंबई पोस्ट या संघांनी व्यावसायिक गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत शानदार धडक दिली आहे.
सेंट्रल रेल्वेने स्वामी समर्थ संघाचा ३६-१९ असा १७ गुणांनी पराभव केला. यात आशीष नरवाल (चढाई) व अरकम शेख (पकड) यांनी विजयात मोलाची भूमिका बजावली. तसेच, मुंबई पोस्टलने पी. डी. हिंदुजाचा ६१-२९ असा ३२ गुणांनी धुव्वा उडवला. यात सौरभ पाटील आणि संकेत सावंत चमकले. इतर व्यावसायिक सामन्यांत बीपीसीएलने जे. जे. हॉस्पिटलचा (४१-१८) तर बीएमसीने बेस्टचा (४०-३२) पराभव केला.
कुमार गटात अंकुर स्पोर्ट्स क्लबने यश क्रीडा मंडळाचा ५०-३५ असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला. आता उपांत्य फेरीत अंकुरची गाठ गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबशी पडेल, ज्यांनी जय भारत सेवा मंडळावर ३६-१९ ने मात केली आहे.
महिला गटात मुंबई पोलीस संघाने अमर हिंद मंडळाचा (३९-१३) आणि शिवशक्ती संघाने विश्वशांती स्पोर्ट्स क्लबचा (४६-१०) मोठ्या फरकाने पराभव करत दमदार विजय मिळवले.





























































