पालघरकरांची आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर, आदिवासी रुग्णांची उपचारासाठी फरफट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर जिल्ह्याच्या स्थापनेला जवळपास दशक उलटले तरी जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर आणि महिला व बाल रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या आरोग्य सुविधा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने आदिवासींसह ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब रुग्णांची परवड होत आहे. उपचारासाठी सर्वसामान्य रुग्णांची मुंबई, ठाण्यात फरफट होत असून यात अनेकदा रुग्णांचा बळी जात आहे. मात्र इतकी भयंकर परिस्थिती असूनही सरकार ढिम्म असल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सुमारे 188 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी उभारलेले ट्रॉमा केअर सेंटरही निधीअभावी रखडले आहे. तसेच महिला व बाल रुग्णालयाची घोषणाही प्रत्यक्षात उतरलेली नाही. जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा येथील आरोग्य सुविधांची स्थितीही चिंताजनक आहे.

ग्रामीण भागातील गर्भवती माता, नवजात बालके आणि लहान मुलांना आवश्यक तज्ज्ञ उपचार मिळत नाहीत. परिणामी माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे.

जिल्ह्यात आरोग्य सुविधा तोकड्या असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीही जिल्हा नियोजन समितीत मान्य केले आहे. यावरून जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्यव्यवस्था समोर आली आहे.

गंभीर आजार, प्रसूती गुंतागुंत, अपघात किंवा तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांना गुजरात, ठाणे किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची अवस्था जिल्हा रुग्णालयासारखी झाली आहे. इमारत पूर्ण आहे मात्र निधीअभावी हे सेंटर कागदावरच राहिले आहे.

जिल्ह्यात तातडीने सुसज्ज जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, महिला व बाल रुग्णालय उभारण्यासह दुर्गम भागातील आरोग्य सुविधा बळकट करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींनी यावर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी माजी आमदार सुनील भुसारा यांनी केली आहे.